नारायण राणे अलिबाग पोलिसांसमोर; मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा देणार जबाब

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी  एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कानशिलात लगावण्याची भाषा केली होती. त्यांच्या या एका वक्तव्यावरुन सबंध महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करत रोष व्यक्त केला. यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. राणेंनी केलेल्या वक्तव्यावरुन ठिकठिकाणी त्यांच्यावर तक्रार दाखल केली गेली आहे. नारायण राणे हे अलिबागमधील रायगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावणार असून मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा ते जबाब देणार आहेत.

नारायण राणे हे सध्या मुंबईमधील जुहू येथील निवासस्थानी असून ते पावणेबाराच्या सुमारास अलिबागच्या दिशेने रवाना होणार आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत ते अलिबागमध्ये पोहणार असल्याची माहिती समोर आली आहे. आजच या प्रकरणासंदर्भात राणे यांचा जबाब नोंदवून घेतला जाणार असल्याचंही बोललं जात आहे. नारायण राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी आज सकाळी राणेंच्या जुहू येथील निवासस्थानी त्यांची भेट घेतल्यानंतर यासंदर्भातील माहिती दिली.

नारायण राणे यांना महाड प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी अटक झाल्याच्या दिवशीच रात्री जामीन मंजूर करताना महिन्यात दोनवेळा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावण्याची अट घातली होती. मागील वेळेस नारायण राणे यांनी प्रकृतीचं कारण देत हजेरी लावली नव्हती. आज मात्र नारायण राणे अटक आणि सुटका प्रकरणानंतर पहिल्यांदात पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये हजेरी लावणार आहेत.

दरम्यान, आजच या प्रकरणासंदर्भात राणे यांचा जामीन नोंदवला जणार असल्याचं सांगण्यात येत असून राणे आज अलिबागमध्ये येणार असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :