नारायण राणेंना महसूल खाते नाहीच

fadnavis-rane

मुंबई :काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा राज्य मंत्रिमंडळातील समावेश नक्की असला तरी त्यांना महसूल हे मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे खाते मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे . श्री . राणे हे या खात्यासाठी असून बसले होते व हे खाते मिळण्याचा शब्द मिळाल्यानंतरच त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असे सांगितले जात होते . या पार्श्वभूमीवर त्यांना महसूल खाते मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे .

राणे यांना सार्वजनिक बांधकाम अथवा गृहनिर्माण खाते दिले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते आहे . २००५ मध्ये राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना तत्कालीन मंत्रिमंडळातील महसूल खाते देण्यात आले होते . त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुख यांना शह देण्यासाठी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला आवर घालण्यासाठी राणे यांना काँग्रेसमध्ये आणण्यात आले होते . सहा महिन्यात तुम्हाला मुख्यमंत्री करू असा शब्द काँग्रेसच्या तेंव्हाच्या प्रदेश प्रभारी मार्गारेट अल्वा यांनी राणे यांना दिला होता. मात्र तोपर्यंत राणे यांना महसूल खात्यावर समाधान मानण्यास सांगितले होते. यावेळी काँग्रेस मधून बाहेर पडताना राणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडे मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाच्या खात्याची मागणी केली होती . टी मागणी मान्य झाल्याचे सांगण्यात येत होते . प्रत्यक्षात राणे यांना हवे असलेले महसूल खाते सध्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडेच राहणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्येष्ठता क्रमाच्या यादीत विधान परिषदेचा सभागृह नेता हा मुख्यमंत्र्यांखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचा असेल अशा आशयाचे पत्रक सामान्य प्रशासन विभागाकडून नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. विधान परिषदेचे सभागृह नेते चंद्रकांत पाटील हे आहेत . त्यामुळे पाटील हे मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकावर राहतील हे आता स्पष्ट झाले आहे