कोकणात शिवसेनेला हरवण्यासाठी नारायण राणेंची राष्ट्रवादीशी सलगी

टीम महाराष्ट्र देशा : विधानपरिषद निवडणुकीने महाराष्ट्रच्या राजकारणात मोठ्या राजकीय हालचाली होत आहेत. बीड – लातूर – उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रमेश कराड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन जबर धक्का दिल्या नंतर आता नुकतेच भाजपच्या जवळ आलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कोकणात विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना आपला पाठींबा दिला आहे. थोड्याच वेळात नारायण राणे यासंदर्भात अधिकृत घोषणा करणार आहेत.

दरम्यान, कोकणात यापूर्वीच शिवसेनेकडून राजीव साबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोकणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने विधानपरिषदेसाठी उमेदवार उभा करावा, असा प्रस्ताव भाजपने दिला होता. मात्र, नारायण राणेंनी स्वत:च्या पक्षाचा उमेदवार उभा न करता, अनिकेत तटकरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेसमोरच्या अडचणी आता आणखी वाढणार आहेत. त्यामुळे आता उमेदवार जरी राष्ट्रवादीचा असला तरी कोकणात राणे विरुद्ध शिवसेना असा सरळ सामना रंगणार आहे.

अनिकेत तटकरे हे राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांचे सुपुत्र आहेत. अनिकेत तटकरे यांची बहीण आदिती तटकरे या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. अनिकेत तटकरे ज्या जागेवरुन विधानपरिषदेसाठी लढत आहेत, त्या जागेवरुन यापूर्वी त्यांचेच काका अनिल तटकरे हे आमदार होते.Loading…
Loading...