लवकरच नाणारमध्ये सभा घेऊन शिवसेनेचा खरा चेहरा उघडकीस आणणार – नारायण राणे

नारायण राणे

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नाणारमधील ग्रीन रिफायनरीबाबत शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर सडकून टीका केली. मालवण येथील निलरत्न निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी उद्योगमंत्री शिवसेनेचा असताना शिवसेनेची नेतेमंडळी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी नाणारला का जातात असा सवाल उपस्थित केला.

नाणारमध्ये नेते मंडळी येतात, आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगतात मात्र एकीकडे विरोध करायचा व दुसरीकडे या कामाचे ठेके घ्यायचे अशी दुटप्पी भूमिका शिवसेनेची आहे. याआधी एन्रॉन आणि जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाला प्रथम विरोध केला होता. शिवसेनेची भूमिका नेहमीच दुटप्पी राहिली असल्याची टीका नारायण राणे यांनी केली.लवकरच नाणारमध्ये सभा घेऊन शिवसेनेचा खरा चेहरा उघडकीस आणणार असल्याचा इशारा ग्रीन रिफायनरीवरील शिवसेनेच्या भूमिकेबाबत बोलताना नारायण राणे यांनी दिला.

‘जिल्ह्यातील विकासकामे रखडविण्यात छुपे हात आहेत’ या पालकमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेताना नारायण राणे यांनी ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी स्थिती पालकमंत्र्यांची असून जिल्ह्याच्या विकास कामांसाठी करोडो रुपयांचा आणलेला निधी त्यांनी दाखवून द्यावा आणि त्यांनी आणला असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी तो जाहीर करावा असे आव्हान नारायण राणे यांनी दिले.जिल्ह्यातील ठेकेदारांशी माझा कोणताही संबंध नाही. विकासकामांना माझ्यामुळे ठेकेदार मिळत नाहीत हा आरोप खोटा असल्याचे नारायण राणे यांनी स्पष्ट केले.पर्यटन वाढीसाठी महोत्सवांचे आयोजन करणे आवश्यक आहे मात्र सत्ताधारी याबाबत अनुत्सुक असून मालवणात एप्रिलमध्ये महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.