fbpx

कोणाच्या तरी सांगण्यावरूनचं काही एजन्सी विरोधी नेत्यांना घाबरवत आहे : नारायण राणे

नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा : भाजप प्रवेशाच्या चर्चेत असणारे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी ईडी आणि सीबीआयच्या सुरु असलेल्या चौकशी सत्रावरून भाजपला अप्रत्यक्षरित्या टोले मारले आहेत. एखाद्या व्यक्तीला बदनाम करायचं असल्यास यासाठी काही एजन्सी काम करत आहेत, असे म्हणत नारायण राणे यांनी ईडी आणि सीबीआयला टार्गेट केले. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबतचे वक्तव्य केले आहे.

यावेळी राणे म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला बदनाम करायचं असल्यास यासाठी काही एजन्सी काम करत आहेत, मी त्या एजन्सीच्या म्होरक्यांना पकडलं आहे. त्यांना मी विचारलं की असं का करताय, तेव्हा त्यांनी काही जणांच्या आदेशावरून असं करावं लागतं. अशी सात एक लोकांची टीम आहे. त्यात काही वकील आहेत, काही सीए आहेत. भुजबळांचाही त्याच टीमनं बळी घेण्याचा प्रयत्न केला होता. ती टीम कसं काम करते आणि ते विरोधकांना कसे ब्लॅकमेल करतात हे वेळ आल्यावर सांगेन, असंही राणे म्हणाले.

दरम्यान राज्याच्या राजकारणात ईडी आणि सीबीआय महत्वाच्या भूमिका बजावत आहेत. कारण विरोधकांनी ईडी आणि सीबीआयला भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशी उपमा दिली आहे. तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने चौकशीची नोटीस धाडली आहे. यावरु राज्यातील काही नेत्यांना ईडी आणि सीबीआय चौकशीची धडकी भरली आहे. तर काही नेत्यांनी ईडी आणि सीबीआयच्या चौकशीवरून सत्ताधारी भाजपला टार्गेट केले आहे.