आमच्या वाटेला याल तर मुळासकट उपटल्याशिवाय राहणार नाही – नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा: नारायण राणेंना संपविणे तेवढे सोपे नाही, आमच्या वाटेला लागू नका, आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही. आमच्या वाटेला याल तर मुळासकट उपटल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी गृह (ग्रामीण), अर्थ व नियोजन मंत्री दीपक केसरकर यांना सावंतवाडी येथे बोलताना दिला.केसरकर यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी न्यायालयात जाणार असून, बोलणाऱ्या आणि छापणाऱ्यांविरुद्ध एक डझन वकील कामाला लावले आहेत, असेही नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे.

नारायण राणे म्हणाले, “मी गुन्हेगार आहे तर गुन्हा दाखवा, एक वळवींचा गुन्हा शिवसेनेत असताना सोडला तर एकही गुन्हा आपणावर नाही. आपणास क्राईम ब्राईंचने कुठल्याही गुन्ह्यात तथ्य नसल्याचा रिपोर्ट दिला असून ईडी वगैरे बाबतच्या आरोपाबाबत न्यायालयात खेचणार आहे.’ राणेंच्या नादाला लागता काय? पुरावा द्या, सोडणार नाही असा इशारा देऊन पालकमंत्र्यांची सगळी प्रकरणे फोटोसह छापणार, त्याच्या सर्व सिडी आपल्याकडे आल्या असल्याचा दावा देखील नारायण राणेंनी केला आहे.