भाजप – सेना युती झाली तर आम्ही स्वबळावर लढू – नारायण राणे

टीम महाराष्ट्र देशा : भाजपने शिवसेनेशी युती केली तर आपण स्वबळावर निवडणूक लढवू. मात्र, असे झाले तर आपण काँग्रेस-राष्ट्रवादी सोबतही जाणार नाही असा शब्दच भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार असलेले नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांना हा शब्द दिला आहे.

दरम्यान, आपण भाजपबाबत नाराज नसून देशात पुन्हा भाजपचीच सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी या भेटीनंतर बोलून दाखविला. तर दुसरीकडे स्वाभिमान महाराष्ट्र पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे यांच्या काँग्रेस वापसीबाबत चर्चा सुरू असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. नारायण राणे काँग्रेसच्या संपर्कात आहेत. त्यांची घरवापसी होऊ शकते, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केल्याने नारायण राणे हे भाजपशी फारकत घेणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांशी वर्षावर भेट घेत राजकीय रणनीतीवर चर्चा केली. या दोघांमध्ये जवळपास तासभर राजकीय चर्चा झाली. या चर्चेत राणे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीतील आपली भूमिका फडणवीस यांच्यासमोर मांडली.

या भेटीबाबत बोलताना राणे म्हणाले, मला सुरुवातीला जी आश्वासने दिली ती पाळली नाहीत हे खरे असले तरी त्यामुळे मी काही नाराज नाही. आपण येणारी निवडणूक स्वतंत्रपणे लढविणार असल्याचे मुख्यमंत्र्यांना स्पष्ट केले आहे. भाजपने जर शिवसेनेशी युती केली तर आपण सोबत रहाणार नाही. आपण स्वतंत्र निवडणूक लढवू. त्याचवेळी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीसोबतही जाणार नाही. आपण सर्वच पक्षाविरोधात निवडणूक लढवू, असे राणे म्हणाले. भाजपशी शिवसेनेशी युती झाली नाहीतरी भाजपला राज्यात सर्वाधिक जागा मिळतील आणि देशातही भाजपचीच सत्ता येईल, असेही राणे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, स्वाभिमान महाराष्ट्र पक्ष किती जागा लढणार याबाबत माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.