राणेंचा ‘स्वाभिमान’ भाजपात विलीन होणार, नीतेश राणे कमळाच्या चिन्हावर लढणार

टीम महाराष्ट्र देशा: येत्या दोन तीन दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा मंगळवारी कणकवली येथे दाखल झाली, यावेळी नारायण राणे यांनी त्यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतानंतर राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री फडणवीस हे दिलेला शब्द पाळतील, असा आपल्याला विश्वास आहे. लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं राणे यांनी सांगितले आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत नितेश राणे हे कमळाच्या चिन्हावर लढतील, असं त्यांनी सांगितले आहे.

राणे यांनी कॉंग्रेसला सोडचिट्ठी दिल्यापासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोलले जात होते. मात्र शिवसेनेच्या विरोधामुळे त्यांना स्वतंत्र पक्ष स्थापन करावा लागला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केले आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून काय भूमीका घेतली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाची बातमी  

शिवसेना नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नावावर जिंकते, आता युती टिकवायची असल्यास माफी मागा