नाराज नारायण राणे यांच्याशी चर्चा करणार- डॉ. पतंगराव कदम

patangrao kadam amd rane

सांगली : शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये नारायण राणे यांनी प्रवेश केल्यानंतर पक्षाने त्यांना सत्तेची भरपूर पदे दिली आहेत. त्यांच्या कणकवली मतदारसंघातील पराभवानंतरही विधान परिषदेवर कॉंग्रेसनेच संधी दिली असताना नारायण राणे नाराज का, असा प्रश्‍न उपस्थित करीत त्यांची कॉंग्रेस सोडण्याची विचारधारा बदलण्याचा आपण प्रयत्न करू, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी केले.

देशात व राज्यात भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर अनेक पक्षाचे नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हेही पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त गेले काही दिवस माध्यमातून येत आहे. त्यासंदर्भात बोलताना डॉ. पतंगराव कदम म्हणाले, की नारायण राणे यांच्या मनात भाजप प्रवेशाचा प्रश्‍न का घोळत आहे? तसेच कॉंग्रेस सोडण्याचा विचार ते का करीत आहेत, याचा सध्या आपण अभ्यास करीत आहोत. ते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या आधी आपल्याशी बोलणार आहेत, असे सांगून आजही राणे पिता- पुत्र आपल्या संपर्कात असल्याचे सांगून त्यांचे मत परिवर्तन करता येईल का, याचाच आपण सध्या विचार करीत आहोत.

लोकसभा- विधानसभा निवडणुकीत राणे पिता- पुत्रांचा पराभव हा शिवसेना- भाजपनेच केला आहे, असे वक्तव्य करून ते म्हणाले, की त्यानंतरच्या काळात मुंबई विधानसभेचीही उमेदवारी त्यांना देऊ केली होती. परंतु या मतदारसंघातही त्यांचा पराभव झाल्यानंतर कॉंग्रेसने त्यांना प्रवाहात राहण्यासाठी विधान परिषदेची संधी दिली. पक्षाने आणखी कोणता विचार त्यांच्यासाठी करायला हवा होता, हेच आपणाला उमगत नाही, असा मुद्दा उपस्थित करून नारायण राणे यांना कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता का वाटत आहे व त्यांच्या भाजप प्रवेशापासून परावृत्त करण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करणार असल्याचेही डॉ. पतंगराव कदम यांनी सांगितले.

आगामी निवडणुकीत कॉंग्रेस सर्व समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढविणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस हे कॉंग्रेसचेच एक अंग आहे. त्यामुळे त्यांची सोबत ही महत्त्वाची आहे, असा विश्‍वास व्यक्त करून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसबाबत जे मत व्यक्त केले होते, ते त्यांनी खोडून काढले. कॉंग्रेसने शेतक-यांच्या प्रश्‍नांच्या मुद्यावर आवाज उठविल्यानंतरच फडणवीस सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. परंतु ही कर्जमाफी फसवी आहे, असा टोला लगावत ते म्हणाले, की राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना या कर्जमाफीचा लाभ किती झाला, हे जाहीर होणए गरजेचे आहे. येत्या काही दिवसात ही आकडेवारी पुढे आल्यानंतर कॉंग्रेस त्यावर आपली भूमिका मांडेल, असेही डॉ. पतंगराव कदम यांनी सांगितले.