दहिगावं उपसा सिंचन: पाटील-बागल गटात कलगीतुरा

narayan patil vs rashmi bagal

 

करमाळा- करमाळा तालुक्यातील बहुचर्चित दहिगावं उपसा सिंचन योजणेचे दुसऱ्या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात असून मे २०१८ अखेर पूर्ण होणार आहेत. परंतु ऐन उन्हाळ्यात गारवा देणाऱ्या ह्या योजनेच्या श्रेयासाठी तालुक्यातील राजकीय वातावरण मात्र तापले असून पाटील-बागल गटात कलगीतुरा रंगल्याचे चित्र आहे.

करमाळा तालुक्यात पुर्व भागात एकूण २९ गावे दुष्काळग्रस्त आहेत. ही गावे दुष्काळ मुक्त होण्यासाठी तत्कालीन शिवसेना-भाजप युतीने १९९५ मध्ये दहिगावं उपसा योजनेला मंजुरी दिली. या योजनेचे दुसऱ्या टप्प्यातील काम येत्या मे अखेर पूर्ण होणार आहे परंतु या कामाचे श्रेय घेण्यासाठी पाटील-बागल गटात सध्या रस्सीखेच सुरू आहे.दहिगावं उपसा सिंचन योजनेमुळे तालुक्यातील पुर्व भागात असलेल्या २४ गावांत एकूण १० हजार ५०० हेक्टर जमीन ओलीताखाली जाणार आहे. याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होणार आहे.

राजकीय द्वेषातून पाटील गटाच्या समर्थकांनी हे काम अडविण्याचे काम केले- माजी आमदार श्यामल बागल

दहिगावं उपसा सिंचनाचे काम होण्यासाठी आमच्या काळात ८२ कोटी रूपयांचा निधी मिळविलेला होता. सातत्याने पाठपुरवठ्यामुळे कामाला गती मिळाली होती. दहिगावं उपसा सिंचनाचे काम दोन टप्प्यात असून ही योजना पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. याचे राजकारण होऊ नये तसेच विद्यमान लोकप्रतिनीधी या कामाचे श्रेय घेण्याचे प्रयत्न करीत आहेत. ह्या योजनेचे पहिल्या टप्प्यातील काम आपल्या कार्यकदीत पूर्ण होणार होते परंतु राजकीय द्वेषातून पाटील गटाच्या समर्थकांनी हे काम अडविण्याचे काम केलेले होते.

बागल कुटुंबीयांनी नेहमी दहिगावं उपसा सिंचनाचे राजकारण केले- आमदार पाटील

बागल कुटुंबीयांनी नेहमी दहिगावं उपसा सिंचनाचे राजकारण केलेले आहे. १५ वर्षे आमदारकीची सत्ता असताना त्या काळात दहिगावं उपसा सिंचन का पूर्ण झाला नाही. आता हे काम माझ्या पाठपुरवठ्यामुळे पूर्ण होत आहे. पहिल्या टप्प्यातील काम माझ्या कार्यकदीत पूर्ण झालेले असून दुसऱ्या टप्प्यातील काम सध्या पूर्णात्वास आलेले आहे.दहिगावं योजनेचे काम आमच्या समर्थकांनी अडविल्याचा आरोप बागल करीत आहेत मग त्यांच्या आमदारकीच्या काळात कोळगाव योजना का रखडली? उत्तर द्यावे तसेच तालुक्यातील मकाई आणि आदिनाथ कारखान्याचा कामगारांना पगारी, वाहतूकदारांची देनी याकडे लक्ष द्यावे. तालुक्यातील जनतेची दिशा भुल करून राजकारण करू नये.