नांदेड आरटीओ कार्यालय; २० जण कोरोनाबाधीत, कामकाज ३० एप्रिल पर्यंत बंद

नांदेड: जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे प्रशासन विविध योजना राबवुन जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, याची खबरदारी घेत आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कार्यालयीन कामकाज नियंत्रित केले, तरीही गर्दी रोखणे शक्य होत नाही. कार्यालयात कर्मचारी व अधिकारी यांचा कोरोनापासून बचाव न झाल्यास भविष्यातील कार्यालयीन कामकाजावर दिर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ७ ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीपर्यत खटला विभाग व आस्थापना विभाग वगळता कार्यालयाचे संपूर्ण दैनंदिन कामकाज व शिबीर कार्यालयाचे कामकाजही ३० एप्रिल २०२१ पर्यत बंद करण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाने वाहननिषयक, अनुज्ञप्ती विषयक कागदपत्रांची वैधता ३० जून २०२१ पर्यंत वाढविलेली आहे, यांची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी लागू केल्याने ५ पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास प्रतिबंध केला आहे. या कार्यालयात दैनंदिन कामकाजनिमित्त येणाऱ्या अजर्दारांची संख्या खूप जास्त असल्याने जमावबंदी आदेशाचे उल्लंघन होते. त्यामुळे सद्य:स्थितीत या कार्यालयात कार्यरत असणारे सुमारे २० अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली असल्याने कार्यालयाचे कामकाज प्रभावित झाले आहे.

महत्वाच्या बातम्या