नांदेड; रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी ताब्यात!

नांदेड: जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढतो आहे, त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या आठवड्यापर्यंत कोरोना बाधितांसाठी  अत्यावश्यक असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन चौदाशे रुपयांना मिळत होते परंतु गत काही दिवसात कृत्रिम टंचाई निर्माण करुन त्याचा काळाबाजार होत असल्याने कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची होणारी पायपीट पाहून पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांनी सतत ओरड केल्यानंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा भंडाफोड झाला आहे.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे औषधी प्रशासन व ठोक औषधी विक्रेते  यांच्यातील साटेलोटे उघड झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते व सेनेचे गौतम नरसिंगदास जैन हे आपल्या कोरोनाबाधीत नातेवाईकासाठी रेमडेसीवीर इंजेक्शनच्या शोधात होते. त्याची मूळ किंमत ५४०० असताना हे इंजेक्शन काही इसम प्रत्येकी ८ हजार रुपयांना विकत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात ७ एप्रिल रोजी दिली.

या माहितीनंतर पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी लगेच या इसमांचा शोध घेऊन त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच ही माहिती औषधी प्रशासन विभागाला ही दिली. त्यानंतर दोन्ही विभागाकडून समांतर शोध घेत सदर नातेवाईकाच्या मदतीने रेमडेसीवीर १०० एमजी इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या इसमाचा शोध घेतला. त्यात वीरभद्र संगाप्पा स्वामी, बाबाराव दिगांबर पडोळे, बालाजी भानुदास धोंडे, विश्वजीत दिगांबर कांबळे ऊर्फ बारडकर यांना अटक करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या