नांदेड जिल्हा; रेमडेसिवीरचा काळा बाजार, आरोग्य यंत्रणा ढेपाळली

नांदेड: जिल्ह्यात कोरोनाचा जसजसा पादुर्भाव वाढत आहे, तसतसा रुग्णांचा आकडा सुद्धा वाढत आहे. त्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याने सामान्य रुग्णांचे हाल होत आहे. अनेक रुग्णांना दाखल होताच रेमडेसिवीर इंजेक्शनचा डोस द्यायचा असल्याने इंजेक्शनची मागणी केली जात आहे. या इंजेक्शनसाठी नातेवाईक वणवण भटकत आहेत. एकाच कुटुंबातील दोन,तीन किंवा चार जण कोरोनाबाधीत आल्यावर तर त्या कुटुंबाचे बेहाल होत आहे.

कोरोना रुग्णांना अत्यावश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन नांदेड शहर व परिसरात १४०० रुपयांना देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर काही दिवस हे इंजेक्शन त्याच किमतीत अनेकांना मिळालेही. परंतु गत सहा दिवसांपासून पुन्हा त्याचा काळाबाजार सुरु झाला आहे. एकीकडे प्रशासनाने ४४०० इंजेक्शन उपलब्ध केल्याचे सांगत त्यापैकी ३ हजारावर इंजेक्शन शासकीय रुग्णालये व अन्य खासगी रुग्णालयांसाठी दिले. मात्र एका रुग्णाला सहा -सहा इंजेक्शनचा डोस आवश्यक असल्याचे सांगत डॉक्टर एकदमच एवढे इंजेक्शन मागवत असल्याने काळाबाजार तेजीत आला आहे.

विशेष म्हणजे जेथे कोविड सेंटर दिलेत ती काय शोभेची वस्तू म्हणून दिले की काय, असा संतप्त सवाल रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत. या खासगी रुग्णालयांच्या औषधी दुकानातही रुग्ण क्षमतेएवढी रेमडेसिवीर इंजेक्शन असू नयेत यामागचे गौडबंगाल नेमके काय?, असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अनेक रुग्ण व त्यांचे नातेवाईक पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते, भाजपाची कोविड हेल्पलाईन आदींशी संपर्क करुन या इंजेक्शनसाठी अक्षरश: गयावया करीत असून कोरोना योध्दे म्हणवणारे अधिकारी तर फोन उचलण्याची तसदीही घेत नसल्याचा विदारक अनुभव येत आहे.

महत्वाच्या बातम्या