हिंगोली; येत्या दोन दिवसात संचारबंदी न हटविल्यास सर्व दुकाने उघडू, व्यापारी संघाचा इशारा

हिंगोली: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यात वारंवार लावण्यात येणाऱ्या लॉकडाऊनमुळे शेतकरी, व्यापारी, छोटे व्यावसायीक देशोधडीला लागायची वेळ आली आहे. अनेक कामगारांपुढे कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न पडला आहे, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. असे असताना सरकारी यंत्रणा मात्र केवळ ‘लॉकडाऊन’चा पर्याय वारंवार अवलंबत आहे.

प्रशासनाच्या अशा भूमिकेवर सर्वस्तरातून प्रचंड नाराजी व्यक्त होत असून, सध्या सुरू असलेलली संचारबंदी येत्या दोन दिवसात न हटविल्यास सर्व दुकाने उघडण्यात येतील, असा इशारा जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आले. कोरोनामुळे मागील वर्षभरात अनेक वेळा संचारबंदी लावण्यात आली. एकाच महिन्यात दोन-दोन वेळा ही संचारबंदी लावण्यात येत असल्याने यामध्ये व्यापारी, शेतकरी, कामगार, सर्वसामान्य वर्ग भरडल्या जात आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

तर दुसरीकडे दुकान भाडे, घरभाडे, लाईट बीलसह सर्व प्रकारचे कर मात्र भरावे लागत आहेत. उत्पन्न शून्य असताना खर्च मात्र पुर्वी प्रमाणेच सुरू आहे. कर भरण्यास उशीर झाल्यास शासनाकडून दंडही आकारण्यात येत आहे. हा प्रकार म्हणजे सामान्य जनतेवर एक प्रकारे अन्यायच असून, त्या विरोधात आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वात आता हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ उभा राहिला असून, येत्या दोन दिवसात संचारबंदी हटविण्यात यावी व व्यावसायीकांना व्यवसाय करू द्यावा; अन्यथा सर्व व्यापारी आपली दुकाने उघडतील असा इशारा देण्यात आला.

महत्वाच्या बातम्या