कोकणात ‘नाणार’ प्रकल्प होणारचं – फडणवीस

मुंबई : कोकणात होत असलेल्या नाणार प्रकल्पाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार नारायण राणे यांचा विरोध आहे. कोकणात कोणत्याही परिस्थितीत नाणार होऊ देणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे. तर नाणार प्रकल्पाची एकही वीट रचू देणार नाही, सरकार नाणारच्या भूमिकेवर ठाम असेल तर, मी खासदारकीचा राजीनामा देईल असं नारायण राणे यांनी म्हंटले आहे.

दरम्यान शिवसेनेकडून कोकणात नाणार प्रकल्पाच्या उभारणीला होत असलेल्या विरोधानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कोणीही विरोध केला तरी कोकणात नाणार होणारचं असं त्यांनी म्हंटलं आहे.

नाणार प्रकल्प होणं हे महाराष्ट्राचं भाग्य आहे. राज्याच्या हितासाठी प्रकल्प होणं गरजेचं असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. मुंबईत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका कार्यक्रमात उपस्थित होते.

नाणार प्रकल्पाला काहींचा विरोध आहे, पण चर्चेनं वाद सोडवू, असंही फडणवीस म्हणाले आहेत. तर जमिन संपादन करणं हे कटू वास्तव आहे. त्यावर खुल्या मनाने चर्चा करून मार्ग काढू असं पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी म्हटलं.