मुख्यमंत्र्यांनी नाणार जाणार की नाही हे पारदर्शीपणे सांगावे – जयंत पाटील

Jayant patil

नागपूर  – मुख्यमंत्र्यांनी पारदर्शीपणे आणि स्पष्टपणे नाणार प्रकल्प करायचा आहे की नाही हे स्पष्ट करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात केली.त्यानंतर ते मिडियाशी बोलत होते.

महाराष्ट्राच्या विधानसभेत नाणार प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली त्याला शिवसेनेने सुध्दा पाठिंबा देत आमच्यानंतरही तीच भूमिका घेतली. नाणार प्रकल्प तिथल्या स्थानिक जनतेला नकोय अशी भावना तिथल्या जनतेची झाल्यामुळे आणि जनतेची अपेक्षा आहे की, तो प्रकल्प तिथे होवू नये आणि शिवसेनेचादेखील त्याला विरोध आहे. मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना आम्ही सगळयांना समजावू असा आशावाद दाखवला.परंतु मुख्यमंत्री तो प्रकल्प येणार की नाही येणार याच्यावर स्पष्ट भाष्य करणं टाळत आहेत आणि हे आजच नाही तर गेले दोन महिने ते नाणार प्रकल्पावर गोलगोल बोलत आहेत. याचा अर्थ कुठे तरी मागे निगोशेषन करत आहेत त्या निगोशेषनची किंमत राज्यसरकारला फेडावी लागेल अशी भीती आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

नाणार प्रकल्पावर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी गोलगोल उत्तर दिलं. मुख्यमंत्री स्पष्ट काहीच बोलत नाहीत. त्यावेळी तुम्ही प्रेझेंटेशन देण्याची आवश्यकता नाही असेमी सांगितले कारण यापूर्वीच तुम्ही शिवसेना पक्षप्रमुखांकडे दिले असेल बोललो असता त्यावेळी समोर लक्षात आलं की, शिवसेनेच्या आमदारांनी असे काही प्रेझेंटेशन दिलेले नाही. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या मनात उध्दव ठाकरेंबद्दल किती आत्मियता आहे आणि उध्दव ठाकरे सरकारमध्ये आहेत की सरकारच्या बाहेर आहेत हे यातून स्पष्ट होते असेही आमदार जयंत पाटील म्हणाले.

मुख्यमंत्र्यासमवेत शिवसेनेचे मंत्री मंत्रीमंडळात बसतात त्यावेळी या प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका का घेतली नाही. मुख्यमंत्र्यांच्याविरोधात ज्यावेळी नाणार प्रकल्पाची चर्चा झाली असेल त्यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी विरोध करायला पाहिजे होता. शिवसेनेचे मंत्री मंत्रीमंडळात बिस्किटे खायला बसतात की न्याय देण्यासाठी बसतात असा सवाल आमदार जयंत पाटील यांनी केला.

केंद्रातदेखील अनंत गीते केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळात विरोध केला का कधी. शिवसेनेने दोन्ही ठिकाणी काहीच केले नाही. त्यावेळी शिवसेनेचे राज्यातले मंत्रीही आणि केंद्रीयमंत्रीही झोपा काढत होते असा आरोपही आमदार जयंत पाटील यांनी केला.

याचा अर्थ स्पष्ट आहे की,आता उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. त्याभागातील जनतेचा कैवारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आमचे आमदार भास्करराव जाधव यांनी काल प्रकल्पाबाबत छान भूमिका मांडली आहे. कारण त्या स्थानिक लोकांच्यासमोर काय वाढून ठेवले आहे ते त्यांनी सांगितले. आत्ता प्रश्न आहे की, मुख्यमंत्र्यांनी गोलगोल करण्यापेक्षा नाणार करणार की नाही याबाबत ठामपणाने निर्णय घ्यावा आणि नाणार जाणार की नाही असा प्रश्नही आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात मुख्यमंत्र्यांना केला.