भूमाफियांसाठी राज ठाकरे यांनी नाणार बाबतची भूमिका बदलली ?

raj

मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ म्हणजे नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहिलं आहे. ‘नाणार रिफायनरी’ प्रकल्प गमावणं राज्याला परवडणारं नाही. राज्याचं अर्थचक्र गतीमान करायचं असेल तर या प्रकल्पाबाबत सामंजस्याने भूमकिा घ्या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे.

राज यांनी कधीकाळी या प्रकल्पाला विरोध केला होता. त्यांनी तज्ज्ञांची मते जाणून घेतल्यानंतर आता त्यांचा या प्रकल्पावर विश्वास बसला आहे. कोकणाच्या प्रगतीसाठीच राज ठाकरे यांनी हि भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. नाणार प्रकल्पाला मनसेने सदसदविवकेबुद्धीने पाठिंबा दिला आहे, अर्थबुद्धीने नव्हे,नाणारसाठी वेळ पडल्यास राज ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटू शकतात अशी देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, कधीकाळी या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ठाकरे यांनी अचानक बदललेल्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याच मुद्द्यावरून शिवसेना नेते विनायक राऊत यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी कोकणात येऊन नाणार प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली होती. आता त्यांचं मतपरिवर्तन कसं झालं याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली.नाणारमध्ये 221 भूमाफियांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यांच्यासाठी राज यांनी भूमिका बदलली आहे का?, असा सवाल त्यांनी करत ठाकरे यांच्यावर शरसंधान केले आहे.

दरम्यान,नाणार प्रकल्पाला जनतेचा किती विरोध आहे हे राज ठाकरेंनी स्वतःच्या डोळ्यांनी पहिले आहे. त्यावेळी त्यांनी प्रकल्पाला विरोध करून आंदोलनाला पाठिंबाही दर्शविला होता.रिफायनरीच्या कार्यालयाचे खळ्-खट्याकही मनसेने केले. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलेला पत्रव्यवहार हा आम्हाला धक्कादायक वाटत आहे, अशी प्रतिक्रिया कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी व्यक्त केली.

ठाकरे यांच्या पुढाकारामुळे आता रत्नागिरीच्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे या पार्श्वभूमीवर सोमवारी नाणारमधील काही प्रकल्पग्रस्त राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी ही बैठक पार पडेल. यानंतर आता ते काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :