‘नानाजी, चुकीचे मुद्दे मांडून ओबीसींची दिशाभूल करू नका; आरक्षण देणे ही राज्य सरकारची जबाबदारी’

keshv upadhe

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. निवडणुका घेण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, राज्य सरकारला नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. यानंतर राज्य निवडणूक आयोगाने देखील कोरोना स्थिती आटोक्यात असल्याने रखडलेल्या पोटनिवडणुका त्वरित घेतल्या जातील असे संकेत दिले होते.

यामुळेच आता महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा उफळायला लागले असल्याचे पाहायला मिळत आहे. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली आहे. पटोले म्हणाले की, ‘केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी दिली नाही. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या. यामुळे फक्त महाराष्ट्र नव्हे तर देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन करावे’ असा खोचक सल्ला पटोले यांनी दिला आहे.

यावर आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया देताना नाना पटोले यांना खडेबोल सुनावले आहेत. ‘नानाजी, राज्यात तुमचे सरकार आहे. तुमच्या सरकारच्या बेफिकीरीमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. तुम्ही कांगावा न करता काय करता ते सांगा. चुकीचे मुद्दे मांडून ओबीसींची दिशाभूल करू नका. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणे ही केवळ राज्य सरकारची जबाबदारी आहे.’ असे ट्वीट उपाध्ये यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या