मुंबई : राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापलेले आहे. अशातच अयोध्याला भेट देण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ५ जूनला अयोध्या दौरा करणार आहेत. तर शिवसेना नेत व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे देखील १० जूनला अयोध्या दौऱ्यावरती जाणार आहेत. यातच आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील अयोध्या दौऱ्यावरती जाणार असल्याची बातमी समोर येत आहे.
महंत बृजमोहन दास यांनी नाना पटोले यांना अयोध्या दौऱ्याचे दिलेले आमंत्रण पटोले यांनी स्विकारले आहे. अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत बृजमोहन दास हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. दास यांनी मुंबईतील टिळक भवन येथे पटोले यांची भेट घेतली. या दरम्यान दास यांनी पटोले यांना अयोध्या दौऱ्याचे आमंत्रण दिले. ते पटोले यांनी स्विकारले आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणूका लक्षात घेऊन हा दौरा आयोजित केला जाणार असल्याचे समजते. पटोले यांचा अयोध्या दौरा जूनच्या दरम्यान होणाची शक्यता आहे.
“महंत बृजमोहन दास यांनी माझी भेट घेतली. या भेटीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. भेटी दरम्यान त्यांनी प्रभू श्रीरामाच्या दर्शनाचे आमंत्रण दिले आहे. प्रभू श्रीराम माझे श्रद्धास्थान असून, मी नक्कीच अयोध्येला जाईन,” असे पटोले यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या :