खोटं बोल पण रेटून बोल, अशी भाजपची भूमिका- नाना पटोले

nana patole vs devendra fadnavis

मुंबई : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरु झालं. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार समोर अडचणींचा डोंगर आहे. कारण सत्ताधारी मंत्र्यांवर लागलेल्या आरोपांवरुन विरोधक सरकारची कोंडी करत असल्याचं दिसून येत आहे.

काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आक्रमक झाल्याचं दिसून आलं. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास वैधानिक महामंडळाच्या मुद्द्यावरुन सरकारला धारेवर धरत सभात्याग देखील केला होता. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील भाजप आक्रमक असल्याचं दिसून येत आहे. कोरोना काळातील भ्रष्टाचार, मेट्रो कारशेड, यवतमाळ मधील घोटाळा, विजबिल आदी मुद्द्यांवरून सरकारला घेरलं आहे.

विरोधकांच्या आरोपानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘कोरोना काळात महाराष्ट्र सरकारने जनतेच्या जीवाचे रक्षण करण्याचे काम केले पण या कामात विरोधक सरकारबरोबर आले नाहीत उलट सरकारवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. कोरोनाची चाहूल लागताच डिसेंबर २०१९ मध्येच देशाच्या सीमा सील करण्याची गरज असताना केंद्रातील सरकारने ते काम केले नाही. दिवे लावा, थाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा असे प्रकार केले आणि अचानक लॉकडाऊन लावल्याने गरिब, कामगार, मजूर वर्गाचे झालेले प्रचंड हाल जगाने बघितले. खोटं बोल पण रेटून बोल, अशी विरोधी पक्षाची भूमिका राहिली असून जनता सध्या महागाईने होरपळत असतानाही विरोधी पक्षाने त्यावर बोलणे टाळले.’ असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या