गोपीनाथ मुंडे असते तर ही वेळ आली नसती- पटोले

जर मुख्यमंत्र्यांकडे पैसे नव्हते तर त्यांनी कर्जमाफीचे खोटे आश्वासन का दिले ?-पटोले

नागपूर: भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथ मुंडे हयात असते तर आपल्यावर पक्षत्याग करण्याची वेळ आली नसती अशी घणाघाती टीका माजी खासदार नाना पटोले यांनी केली. ते आज, शनिवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.जर मुख्यमंत्र्यांकडे पैसे नव्हते तर त्यांनी कर्जमाफीचे खोटे आश्वासन का दिले असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला.

खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर नागपुरात आयोजित आपल्या पहिल्या पत्रपरिषदेत पटोले म्हणाले की, स्व. गोपीनाथ मुंडे हे भाजपमधील सर्वात मोठे व एकमेव बहुजन नेते होते. जर मुंडे साहेब हयात असते तर कदाचित माझ्यावर पक्षत्यागाची वेळ आली नसती. ओबीसीच्या मुद्द्यावर त्यांनी नी मला मदत केली असती असे पटोले यांनी सांगितले.पक्षत्याग करण्याच्या कारणांचा उहापोह करताना ते म्हणाले की, खासदार म्हणून पक्षात आणि सरकारमध्ये आपला आवाज दाबला जात होता. ओबीसी, शेती, शेतकरी यांच्या संदर्भात पक्षाच्या बैठकीत प्रश्न विचारू दिले जात नव्हते.प्रस्तावित ओबीसी मंत्रालया संदर्भातल्या बैठकीतही माझ्या आग्रहाकडे पंतप्रधानांनी दुर्लक्ष केले. असे मंत्रालय प्रशासकीय खर्च वाढवेल असे सांगून मोदींनी आपली बोळवण केल्याचा आरोप त्यांनी यावेळी लावला. भाजपने निवडणुकीच्या वेळी आपल्या घोषणापत्रात स्वामीनाथन आयोगाच्या शिफ़ारशी लागू करण्याबाबत आणि वेगळा विदर्भ देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याबाबत सरकारने कोर्टात दिलेले प्रतिज्ञापत्र आपल्याला मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपण वेगळ्या विदर्भासंदर्भात लोकसभेत प्रायवेट बिल दिले असता पंतप्रधानांनी आपल्याला रागावल्याचा आरोपही पटोले यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वाटेला जाऊ नये असा इशारा पटोले यांनी दिला होता. या इशा-याचे कारण काय असे विचारले असता, तो आपला आणि सीएमच्यामधला विषय आहे. मला काय म्हणायचे आहे ते मुख्यमंत्री समजून घेतील असे पटोले यांनी सांगितले. तसेच राज्य सरकारच्या कर्जमाफीवरही यावेळी त्यांनी टीका केली. जर मुख्यमंत्र्यांकडे पैसे नव्हते तर त्यांनी खोटे आश्वासन का दिले असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला. ऑनलाईन कर्जमाफी प्रक्रिया राज्यात राबवणे तुर्तास तरी शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. कुठल्या पक्षात जाणार याबाबत विचरले असता, पटोले म्हणाले की, तुर्तास भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी आपण गुजरातमध्ये जाऊन काँग्रेसचे हात बळकट करणार आहोत. परंतु, नेमके कुठल्या पक्षात जायचे याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. आपल्या मतदारसंघातील जनतेशी चर्चा करून कुठला पक्ष निवडायचा याचा निर्णय घेणार आहे. याबाबत निर्णय झाला की, जाहिर करून असे सुतोवाचही त्यांनी यावेळी केले.