इंद्र बदमाश देव होता, आपल्याकडे तर वरती इंद्र आणि खालतीही इंद्र आहे : नाना पटोले

टीम महाराष्ट्र देशा : नागपूर लोकसभा कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी इंद्र देवाचे उदाहरण देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर चांगलीच टोलेबाजी केली आहे. ते आज काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. इंद्र देव फार बदमाश होता आणि फार लालचीही होता. मात्र त्याच्यावर संकट आले तर तो मोठ्या देवांकडे धावायचा. इथे तर दोन्ही इंद्र आहेत. वरती नरेंद्र आणि खालती देवेंद्र. आता या दोन्ही इंद्रांचे काय करायचे, यांना मारायचं की सोडायचं हे तुम्हाला ठरवायचे आहे. असे म्हणत नाना पटोले यांनी केंद्रातील नरेंद्र आणि राज्यातील देवेंद्र यांच्यावर निशाना साधला.

यावेळी पटोले म्हणाले की, सरकार रोज जीआर-जीआर खेळत असे कारण सरकार रोज जीआर काढत असे आणि सरकारनं जीआर काढल्यानंतर मी कलेक्टरला सांगायचो की, तातडीनं अंमलबजावणी करा, तेव्हा कलेक्टरच सांगायचा, साहेब दोन ते तीन दिवस थांबा, कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर हा जीआर बदललेला असेल. दर आठवड्याला जीआर काढायचा आणि दुसऱ्याच आठवड्यात तो जीआर बदलायचा. आचारसंहिता लागू करण्याच्या आधीही कॅबिनेटची बैठक त्यांनी घेतली होती, त्यावेळी तर १४७ जीआर काढले. नंतर ते जीआर पुढच्या तीन वर्षाला लागू होतील, असं समजलं, असंही नाना पटोले म्हणाले.

दरम्यान या लोकसभा निवडणुकी मध्ये नाना पटोले यांचा सामना भाजपचे केंदीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या बरोबर होणार आहे. त्यामुळे ही लढत देशातील एक रंगतदार लढत म्हणून पाहिली जाणार आहे. विशेष म्हणजे कधी काळी भाजपमध्ये एकत्र राहून एका पक्षासाठी काम करणारे मित्र या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढणार आहेत.