fbpx

निवडणूक संपताच नमो टीव्ही डीटीएच वरून गायब

टीम महाराष्ट्र देशा :  विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत बंदीची मागणी घातलेला नमो टीव्ही निवडणूक संपताच गायब झाल्याचे दिसत आहे. टाटा स्काय, व्हिडीओकॉन, डिश टीव्हीवर नमो टीव्ही वाहिनी मोफत दाखवली जात होती.

लोकसभा निवडणुकी दरम्यान नमो टीव्ही अचानक पद्धतीने ग्राहकांच्या सेट टॉप बॉक्सवर आला होता. नमो टीव्हीवर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणं, मुलाखती आणि कार्यक्रम दाखवले जायचे. त्यामुळे, नमो टीव्हीवर विरोधकांनी चांगलेचं टीकास्त्र सोडले होते. इतकेच नव्हे तर, नमो टीव्ही बंदीची मागणीही विरोधकांनी केली होती. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारीही करण्यात आल्या होत्या.

त्यावेळी, वाद झाल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं निवडणूक आयोगानं वाहिनीला नोटीस बजावली. ही वाहिनी नोंदणीकृत नसल्याचं उत्तर मंत्रालयानं निवडणूक आयोगाला दिलं होतं. वाहिनी नोंदणीकृत नसल्यानं तिच्या प्रेक्षपणासाठी परवानगीची आवश्यकता नाही, असंदेखील मंत्रालयानं उत्तरात नमूद केलं होतं.
तसेच, नियम धाब्यावर बसवून या वाहिनीला परवानगी दिली. सरकारनं आपला प्रपोगेंडा राबवण्यासाठी ही वाहिनी आणली आहे. असे अनेक आरोप विरोधकांनी केले होते.

विशेष म्हणजे, निवडणूक संपताच नमो टीव्ही गायब झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे केवळ निवडणुकीसाठी ही वाहिनी सुरू करण्यात आली होती का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.