लातूरच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनवर आमदार नमिता मुंदडा यांनी डागली तोफ

bjp flag

टीम महाराष्ट्र देशा : लातूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाच्या कारवाईत दंड ठोठावण्यात आलेल्या वाहनधारकांकडून अंबाजोगाई कार्यालयातच दंड जमा करून घेण्यात येणार असल्याने आता या विभागातील वाहनधारकांचा लातूरचा हेलपाटा वाचणार आहे. या विभागाने 80 वाहनधारकांवर कारवाई केली होती. आमदार नमिता मुंदडा यांनी अंबाजोगाई येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास भेट देऊन चर्चा करून तशा सूचना दिल्या. यावेळी या कार्यालयातील लेटलतिफ आणि बेशिस्त कारभाराबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर त्यांचीही बोबडी वळाली.

दोन दिवसांपूर्वी लातूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाने अंबाजोगाईतील स्कूल बस आणि रिक्षा अशा एकूण 80 वाहनांवर कारवाई केली; परंतु या वाहनधारकांना लातूरच्या कार्यालयात दंड जमा करण्यास सांगण्यात आले होते; तसेच दंड भरूनही वाहन परवाना 10 दिवसांसाठी निलंबित करण्याची कारवाई करण्यात येत होती. याबाबत वाहनाधारकांकडून ओरड होत होती. वाहनधारकांचा प्रश्न घेऊन आमदार मुंदडा यांनी उपविभागीय परिवहन अधिकारी कार्यालय गाठले.

दंड अंबाजोगाईच्याच कार्यालयात जमा करून घ्यावा आणि दंड भरलेल्या वाहनांचा परवाना निलंबित करू नये, अशा सूचना त्यांनी दिल्या. येथील कारभाराबद्दलही त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या कार्यालयातून कागदपत्रे वेळेवर मिळत नाहीत, दलालांमार्फतच कामे होतात, या प्रश्नाबाबतही त्यांनी सूचना केली. त्यांच्यासमवेत ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, नगरसेवक शेख रहीम, उपसभापती तानाजी देशमुख, दयानंद मुंडे, ऍड. संतोष लोमटे, हिंदुलाल काकडे होते.

महत्वाच्या बातम्या