fbpx

प्रस्तावित नव्या ठाणे रेल्वे स्थानकाला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव द्यावे…

मुंबई/प्राजक्त झावरे-पाटील : ठाणे रेल्वे स्थानकाचा वाढता बोजा,वाढती गर्दी यामुळे पडणारा ताण नव्या ठाणे स्थानकाला दिलेल्या हिरव्या कंदिलाने हलका होणार आहे. कोपरीतील मनोरुग्णालयाच्या जागेवर हे प्रस्तावित स्थानक होणार असून या बदल्यात आरोग्य विभागाला ठाणे महापालिकडेकडून दुप्पट टीडीआर मिळणार आहे. या नव्या ठाणे स्टेशनला मेट्रोदेखील जोडली जाणार असून, त्याठिकाणी येणाऱ्या सुमारे अडीच लाख प्रवाशांसाठी इतर सोयीसुविधांची व्यवस्था केली जाणार आहे.

thane railway station

गेल्या ८-१० वर्षांपासून ठाणे व मुलुंडच्या दरम्यान स्टेशन व्हावे यासाठी ठाण्याचे सध्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आमदार असल्यापासून प्रयत्नशील होते. तसेच खासदार राजन विचारे दिल्ली दरबारी यासाठी रेल्वे मंत्रालयाशी संपर्कात होते. शिवसेनेची ठाण्यात एकहाती सत्ता असल्यामुळे, तसेच आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी असलेले उत्तम संबंध यांमुळे अनेक महत्वाचे व नागरिकांना अधिकच्या सोयी-सुविधा पुरविण्यासाठीचे प्रयत्न कायमच चालू असतात. मनोरुग्णालयाची जागा आरोग्य खात्याची असल्याने सेनेचेच आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या माध्यमातून त्या जागेचे हस्तांतरण होण्यास मदत झाली.

ठाण्यातील स्थानाकातून जवळपास ७-८ लाख प्रवासी दररोज प्रवास करत असतात त्यातील घोडबंदर, आनंदनगर, वागळे इस्टेट ,मुलुंड चेक नाका, हाजुरी आदी पट्ट्यातील नागरिकांना या नव्या स्थानकाचा फायदा होणार आहे. त्यासोबतच मुलुंडचा काही भाग सुद्धा या स्थानकाला जोडला जाणार आहे. त्यामुळे या स्थानकाने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नव्या स्थानकाला जवळपास २८९ कोटींचा खर्च होणार असून ३० कोटी रक्कम ठाणे महापालिका उचलणार आहे.

हे स्थानक पूर्ण व्हायला जवळपास तीन वर्ष लागणार आहेत परंतु स्थानकाला हिरवा कंदील भेटल्यापासून सोशल मीडियावर या स्थानकाच्या बारशाबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. ठाण्याचे सेनेचे माजी जिल्हाप्रमुख धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव या स्थानकाला द्यावे असे मेसेज सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. ठाण्याच्या वर्तुळात अगदी शेवटच्या व्यक्तीच्या मनात आनंद दिघे या नावाची जादू अजूनही तशीच आहे. अजूनही आनंद दिघे या नावाचा आदरयुक्त दबदबा ठाणे-पालघर जिल्ह्यात कायम आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच राजकारणी गुरुवर्य आनंद दिघे यांना आदर्श स्थानी मानतात. ठाण्यातील कोणीही ह्या नावाला आक्षेप घेऊच शकत नाही. तसेच नागरिकांच्या मनातील या व्यक्तीबाबत असणारी आदराची भूमिका पाहता या नावाला विरोध होणे दुरापास्तच आहे.

एकंदरीत, सोशल मिडियात या स्थानकाचे होत असलेले नामकरण प्रत्यक्षात होईल की नाही हे येत्या काळात ठरेल परंतु हे स्थानक नागरिकांना फायद्याचे ठरणार असल्याने या स्थानकाला मंजुरी देण्यात महत्वाचा वाटा असणाऱ्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा

याही वर्षी पुण्यात पाहायला मिळणार भक्ती – शक्तीचा संगम

राज्यात उभारणार 8 लाख घरे- मुख्यमंत्री