fbpx

समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे ; खासदार संभाजीराजेंची मागणी

chtrapati sambhaji

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली आहे.याअगोदर महामार्गाला दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची तयारी भाजपने आधीच सुरू केली होती,त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या महामार्गाला देण्याची मागणी शिवसेनेने केल्याने भाजप-सेना युतीत तणाव निर्माण झाला आहे. आता खासदार संभाजीराजे भोसले यांनी या महामार्गाला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.

मुंबई व नागपूर या दोन शहरांतील ७१० किलोमीटरचा प्रवास अवघ्या सहा तासांवर आणणारा ‘समृद्धी द्रुतगती महामार्ग’ हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, अमरावती, वर्धा व नागपूर या १० जिल्ह्यांमधून जाणार आहे. या महामार्गाच्या नामकरणावरून शिवसेनेने केलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या मागणीवर भाजपने खासदार संभाजीराजे भोसले यांच्या माध्यमातून राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव पुढे केले असल्याचे बोलले जात आहे.

जिजाऊंच्या ४२१ व्या जन्मदिनानिमित्त सिंदखेड राजा येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना संभाजी राजे यांनी ही मागणी केली. मुंबई आणि नागपूरला जोडणारा ८०० किमी लांबीचा समृद्धी महामार्ग हा जिजाऊंच्या नावाने ओळखला गेला पाहिजे, असे ते म्हणाले.राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त आज सिंदखेड राजा येथे उत्साहात साजरा झाला. यावेळी मराठा सेवा संघ, जिजाऊंचे वंशज शिवाजी राजे, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महाराष्ट्र शासनाच्यावतीने जिजाऊ माँसाहेबांची महापूजा करुन जिजाऊंना अभिवादन करण्यात आले.