सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद पेटला ; राज्यभर मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्यांचे दहन

पुणे: सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केल्यानंतर आता संपूर्ण राज्यात या नामांतराचा वाद पेटला आहे.

सोलापूर विद्यापीठाला श्री सिध्देश्वर किंवा महात्मा बसवेश्वर यांचं नाव देण्यात यावे अशी शिवा संघटनेची २००४ सालापासूनची मागणी होती पण नागपूर येथे झालेल्या धनगर मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली आणि राज्यभर याच्या हिंसक प्रतिक्रिया उमटायला सुरवात झाली आहे. शिवा संघटनेकडून ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण

सोलापूर विद्यापीठाला श्री सिध्देश्वर किंवा महात्मा बसवेश्वर यांचं नाव देण्यात यावे अशी शिवा संघटनेची २००४ सालापासूनची मागणी आहे. सोलापुरात लिंगायत समाजही खूप मोठ्या प्रमाणात आहे. यांचं दैवत सिध्देश्वर आहे तर बसवेश्वर या समाजाचे संस्थापक आहेत. सोलापूर विद्यापीठाच्या स्थापनेपासून लिंगायत समाजाकडून श्री सिध्देश्वर किंवा महात्मा बसवेश्वर यांच्या नावाची मागणी करण्यात येत होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासात न घेता घोषणा केल्याचा आरोप शिवा संघटनेकडून करण्यात येत आहे. तसेच आगामी काळात भाजप आणि मुख्यमंत्र्यांना याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा देखील शिवा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

आता सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद पेटल्यामुळे येत्या काळात हे प्रकरण काय वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.