कुलगुरू मेहरबान; नागराज मंजुळे यांच्यामुळे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान ?

nagraj and Prof Nitin R Karmalkar

पुणे : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यावर मेहरबानी केल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कोट्यावधींचे नुकसान झाल्याचे समोर आलं आहे. विद्यापीठाचे मैदान प्रतितास २५ हजार रुपये दराने भाड्याने देण्याचा नियम असताना कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी त्यांच्या अधिकारात हा नियम डावलून विद्यापीठाचे मैदान ८ महिने कोणतेही भाडे न घेता वापरण्यास दिल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला आहे.

चित्रपट दिग्दर्शकाने सामाजिक कामांसाठी ६ लाख ५० हजार रुपये त्यांच्या स्तरावर खर्च करावे, या अटीवर हे मैदान वापरण्यास देण्यात आले. मात्र ते साडेसहा लाख रुपये अद्यापही दिले नाहीत. या प्रकरणात विद्यापीठाचे १४ कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये ४५ दिवसांसाठी विद्यापीठाचे मैदान भाडयाने घेतले होते. मात्र निर्धारित मुदतीमध्ये त्यांच्या शूटिंगचे काम पूर्ण झाले नाही. विशेष म्हणजे चित्रपटाचा संपूर्ण सेट मैदानामधून हलविण्यासाठी ८ महिन्यांचा कालावधी लागला. त्यापोटी विद्यापीठाकडे किती रुपयांचे भाडे जमा झाले, याची लेखी माहिती सिनेट सदस्य संतोष ढोरे यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे मागितली होती. त्यातून नागराज मंजुळे यांच्याकडून विद्यापीठाने कोणतेही भाडे घेतले नसल्याची माहिती उजेडात आली आहे.

चित्रीकरणासाठी मैदान दिल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अडचणीत