नागपूर मेट्रोच्या `चीन कनेक्शन’चा वाद

नागपूर : संघ परिवारातील विविध संस्था एकत्रित येऊन देशपातळीवर राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान राबविण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे नागपूर `मेट्रो’चे डब्बे तयार करण्याचे कंत्राट चीनच्या एका कंपनीला देण्यात आले आहे. या संदर्भात स्वदेशी जागरण मंचाने आक्रमक भूमिका घेतली असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच तक्रार करण्यात आली आहे. या संदर्भात पंतप्रधानांकडे चर्चेसाठी वेळ देखील मागण्यात आल्याची माहिती स्वदेशी जागरण मंचच्या विचार विभागाचे अखिल भारतीय प्रमुख अजय पत्की यांनी पत्रपरिषदेत दिली.

यावेळी राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियान समितीचे विदर्भ संयोजक सुभाष लोहे, उपाध्यक्ष दादाजी उके, सहसंयोजक माधव गोडसे, कर्नल (सेवानिवृत्त) अभय पटवर्धन, कॅप्टन (सेवानिवृत्त) चंद्रमोहन रणधीर, फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे, विश्व संवाद केंद्राचे प्रसाद बर्वे, समीर गौतम, रविंद्र बोकारे, अतुल मोघे प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी पत्की म्हणाले की, सीमेवर भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणले असताना तसेच घराघरांमध्ये `चायनीज’ वस्तूंचे प्रमाण वाढत असताना या विरोधात संघ परिवारातील विविध संस्था एकत्र येऊन आवाज उठविणार आहेत. स्वदेशी जागरण मंचातर्फे राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा मोहिमेत ऑगस्टमध्ये देशभरात संघ स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. विदर्भात ५ ते २० ऑगस्ट दरम्यान हे अभियान राबविण्यात येणार आहे.

मात्र दुसरीकडे संघाचे स्वयंसेवकच सत्तास्थानी असलेल्या नेत्यांनी नागपूर मेट्रोच्या ६९ डब्यांचे ८५१ कोटी रुपयांचे कंत्राट चक्क चीनच्या एका कंपनीला दिले आहेत. ही दुर्दैवी बाब असून आम्ही सुरुवातीपासून याचा विरोध करत आहोत. देशातच या डब्यांची निर्मिती व्हावी , अशी विनंती आम्ही अधिकारी, मंत्र्यांना केली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे आता पंतप्रधानांकडेच दाद मागितली आहे.