नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून शेळया-मेंढया आखाती देशांमध्ये निर्यात होणार

नवी दिल्ली   : नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या ३० जूनला प्रथमत: दोन हजार शेळया-मेंढया आखाती देशांमध्ये निर्यात होणार असल्याची माहिती आज खासदार डॉ. विकास महात्मे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येथील उद्योग भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन खासदार डॉ. विकास महात्मे यांनी केले. यावेळी कृषी व प्रक्रियाकृत खाद्यपदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाचे (अपेडा) महाव्यवस्थापक उपेन्द्र वत्स उपस्थित होते.

विदर्भातील आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेळया-मेंढयांचे निर्यात करण्याचे पाऊल शासनाद्वारे उचलले जात आहे. पहिल्या टप्प्यात ३० जूनला दोन हजार जिवंत शेळया-मेंढया आखाती देशांमध्ये निर्यात केल्या जातील. निर्यात होणाऱ्या शेळया-मेंढयांची वैद्यकीय तसेच संबंधित तपासणी केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या खेपेच्या शेळया-मेंढया निर्यात केल्या जातील.

केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालय, केंद्रीय कृषी मंत्रालय, मिहान, एअर इंडिया यांच्या संयुक्त सहयोगातून ही योजना आखली गेली, असल्याचे श्री. महात्मे माहिती यांनी सांगितले. या नवीन उपक्रमाद्वारे मेंढपाळ, शेळी पालन करणा-या शेतक-यांना रोजगाराच्या तसेच आर्थिक उत्पन्नाच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. पशुधन हे शेतक-यांसाठी ‘एटीएम’ सारखे असते. पशुधनापासून शेतक-यांना आर्थिक लाभ मिळतो असेही ते म्हणाले.

भविष्यात शेळया-मेंढया निर्यातीसाठी तत्सम सहकारी संस्था निर्माण करण्यात येण्याचा मानस असल्याचे डॉ. महात्मे यांनी सांगितले.