fbpx

महाराष्ट्रातून काँग्रेस संपवणे हाच माझा मुख्य उद्देश : चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करणे आणि राज्यातील युतीच्या सर्व २८८ उमेदवारांसाठी काम करणे हाच मुख्य उद्देश आहे , असे सांगत राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

चंद्रकांत पाटील म्हणाले की , आगामी विधानसभा निवडणुकीत ‘कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्र’ हेच आपले पहिले ध्येय आहे. तसेच युतीच्या २२० हून अधिक जागा निवडून आणण्यासाठी भाजपबरोबरच शिवसेना व मित्र पक्षाच्या उमेदवारांसाठी काम करायचे असून त्यासाठी सर्व २८८ मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी तयारी करावी, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्या योजनांबाबत भाष्य केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना मिळालेले मताधिक्य पाहता, विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचा पराभव करणे अश्यक आहे. मात्र आम्ही २०२४ मध्ये नक्की विजय मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान चंद्रकांत पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी तर आमदार मंगलप्रभात लोढा यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. भाजपच्या प्रदेश मुख्यालयात बुधवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चंद्रकांत पाटील यांनी पदभार स्वीकारला. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्याबरोबरच मंगलप्रभात लोढा यांचाही सत्कार झाला.