‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, शॉकसाठी तयार राहा; मनसेची होर्डिंगबाजी

mns

मुंबई : मनसेने वीजबिलावरून राज्य सरकारला आक्रमक इशारा दिला असून सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. यावेळी नागरिकांनी देखील सामील व्हावं. हा प्रचंड प्रमाणात आक्रोश असून जनतेचा उद्रेक होईल, असा इशारा देखील बाळा नांदगावकर यांनी दिला आहे.

मनसेने राज्य सरकारला वाढीव वीजबिल माफ करण्यासाठी सोमवार म्हणजेच उद्यापर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. जर कोणताही निर्णय सरकारने घेतला नाही तर मनसे रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे. तर, मनसेच्या या आंदोलनाला भाजपचा देखील पाठींबा असून भाजप देखील उद्या आंदोलन करणार आहे.

या जनआंदोलनासाठी मनसेने जोरदार तयारी केल्याचं दिसून येत आहे.  मनसेने दरवाढी विरोधात संपूर्ण दादर-माहीम परिसरात होर्डिंगबाजी केली आहे. . ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ या राज्य सरकारच्या घोषणेलाच टार्गेट करत ‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, ‘सोमवारी भेटूच शॉकसाठी तयार राहा’, अशी खोचक वाक्यं या होर्डिंगजवर लिहिण्यात आली आहेत.

यासह, ‘पगार ५० टक्के लाईटबील मात्र २०० टक्के!’, ‘तीन तिघाडा, लाईट बिघाडा’, ‘नोकऱ्या गेल्या, तरुण झाला बेकार, तरी ठाकरे सरकारने केला वीजबिलाचा प्रहार’, अशी कोचक घोषवाक्य लिहिलेले बॅनर झळकल्यामुळे चर्चेचा विषय ठरत आहेत. मनसेनेचे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी हे होर्डिंग लावले आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार आज काही हालचाल करणार की उद्या मनसे रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात संघर्ष करणार याकडं जनतेचं लक्ष्य लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या