fbpx

‘शेतकरी आणि सिंचनाचे प्रश्न सोडविण्यासाठी संसदेमध्ये माझा प्राधान्यक्रम असेल’

जामखेड : निवडणुकीत मतदारांपुढे मांडण्यासाठी विरोधकांकडे कोणतेही मुद्दे आता राहीलेले नाहीत. केवळ व्यक्तीद्वेषाचे राजकारण त्यांच्याकडून आता सुरु झाले आहे. आम्ही शेतकरी आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर बोलतो, यांना मात्र प्रश्नांचे कोणतेही देणे-घेणे नाही. शेतकरी आणि सिंचनाचे प्रश्न सोडविण्यासाठी संसदेमध्ये माझा प्राधान्यक्रम असेल, अशी ग्वाही भाजपचे महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.

खर्डा येथे बोलताना विखे यांनी विरोधकांचा देखील चांगलाच समाचार घेतला. दरम्यान,याच सभेत बोलताना पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी आघाडी सरकारवर तोफ डागली. कर्जत तालुका हा अविकसितच राहावा, तसेच सिंचन प्रकल्प मार्गी लागु नयेत असेच प्रयत्न कॉंग्रेस सत्तेच्या काळात झाले. मात्र युती सरकारने तालुक्यातील अमृतलिंगसारख्या महत्वपूर्ण प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय घेवून या भागाच्या पाणी प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी निर्णय घेण्याची धमक दाखविली, असे प्रतिपादन शिंदे यांनी केले.