रत्नागिरीची निर्मिती असलेला ‘माझा एल्गार’ चित्रपट लवकरच प्रदर्शित

टीम महाराष्ट्र देशा –   भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध एका स्त्रीने केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा ‘माझा एल्गार’ हा मराठी चित्रपट येत्या शुक्रवारपासून (दि. १० नोव्हेंबर) रत्नागिरीसह महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात एकाचवेळी प्रदर्शित होत आहे. चित्रपटातील कलाकारांसह निर्माता, दिग्दर्शकही रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. मिलिंद कांबळे हे निर्माते असून सर्वच कलाकारांनी त्यांच्या सेटवरील कार्यशैलीचे कौतुक केले आहे

चित्रपटाचे कथानक रत्नागिरी तालुक्यातील वेतोशी गावातून सुरू होते. श्री स्वामी समर्थ फिल्म प्रॉडक्शनने या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण कोतवडे, गणपतीपुळे, आरेवारे, वेतोशीसह रत्नागिरी शहरातही काही भागांत केले. चित्रपटात ऐश्वर्या राजेश, यश कदम, स्वप्नील राजशेखर यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत. रत्नागिरीतील पटवर्धन हायस्कूलची ऋचा आपटे हिने छोट्या मुक्ताईची भूमिका उत्तमरीतीने वठविल्याचे दिग्दर्शक कांबळे यांनी सांगितले. गंधार जोशी, अमोल रेडीज, प्रफुल्ल घाग, पूजा सावंत, बाळा कचरे, बापट यांच्यासह अनेक स्थानिक कलाकारांना या निमित्ताने चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे.

अजून क्षणभर थांब ना… या प्रेमगीतासह अन्यायाला वाचा फोडणा-या स्फूर्तिदायी आणि जोशपूर्ण गीतांचा चित्रपटात समावेश आहे. निखळ मनोरंजनाबरोबर सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न ‘माझा एल्गार’ या चित्रपटात केल्याचे दिग्दर्शक श्री. कांबळे यांनी सांगितले. सौरभ आपटे यांनी निर्मिती केली असून श्रद्धेच्या नावाखाली जो बाजार मांडला जातो, त्यावर भाष्य करणारा हा चित्रपट असल्याचे त्यांनी सांगितले. गावातल्या अपप्रवृत्तींच्या महंताविरोधात एका स्त्रीने उभारलेला लढा यामध्ये चित्रित केला आहे. देवभोळ्या जनतेला जात्यात ओढणाऱ्या धूर्त महंताविरोधातील संघर्ष चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

You might also like
Comments
Loading...