आघाडीने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला; भाजप ठाण्यात उद्या आंदोलन करणार – डावखरे

davkhare

ठाणे : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. निवडणुका घेण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, राज्य सरकारला नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुले राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.

दरम्यान, ओबीसी समाजासाठी हा मोठा धक्का असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील यामुळे ओबीसी समाजाच्या अडचणी वाढणार आहेत. यामुळे भाजपने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. भाजप आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरणार आहे.

भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष आणि आमदार निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आज महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले. ‘महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकीलच दिला नाही. या सरकारने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. राज्य सरकारचा हलगर्जीपणा दिसून येत असून त्यांनी इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला निधीही दिला नाही,’ असा आरोप डावखरे यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले, ‘या हलगर्जीपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय 5 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत.  सरकारच्या या नाकर्तेपणाच्या विरोधात उद्या 15 सप्टेंबर रोजी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे. त्यावर तरी राज्य सरकारने चिंतन करावे,’ असं डावखरे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या