मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या ‘महाविकास आघाडी’ला सरकार स्थापनेची संधी मिळून प्रत्यक्ष शपथविधी झाला, तो दिवस होता २८ नोव्हेंबर २०१९. दरम्यान, आज महाविकास आघाडीला दोन वर्षे पूर्ण झाली असून त्याच वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी पहाटेलाच घेतलेल्या शपथविधी सोहळ्यासही दोन वर्षे झाली. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी सामनाच्या रोखठोक मधून या दोन वर्षांतील राजकीय बदल सांगितले आहेत. तसेच विरोधकांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच वेळी श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ पहाटेच घेतली त्या सोहळ्यासही दोन वर्षे पूर्ण झाली. मुख्यमंत्री ठाकरे सध्या पाठीच्या दुखण्यामुळे इस्पितळात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती उत्तम आहे, पण दोन वर्षांत प्रकृती बिघडली आहे ती राज्यातील विरोधी पक्षाची. सरकारला दोन वर्षे झाली त्यानिमित्ताने श्री. चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘ठाकरे सरकार आता लवकरच पडेल!’ म्हणजे तारखा देण्याच्या फंदातून व छंदातून भाजप अद्यापि बाहेर पडलेला नाही. ठाकरे सरकार पडणार व पुन्हा आम्ही शपथ घेणार, असे श्री. पाटील यांना वाटत असेल तर कोणाला वाईट वाटण्याचे कारण नाही. फक्त त्यांनी इतकेच स्पष्ट केले पाहिजे की, नव्या सरकारचा शपथविधी ते मध्यरात्री करणार की पहाटे? हेच पाटील काही दिवसांपूर्वी पक्षाच्या कार्यकारिणीत म्हणाले होते, ‘सरकार पडेल व आम्ही सत्तेवर येऊ या भ्रमातून पक्षाने आता बाहेर पडले पाहिजे. आता विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडावी लागेल.’ तेच पाटील चार दिवसांत ठाकरे सरकार पडेल असे छातीठोकपणे सांगतात.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’ठाकरे सरकारने गेल्या दोन वर्षांत नेमके काय केले ते मी नंतर लिहीन, पण मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांची प्रतिमा स्वच्छ आहे. लोकांत ते प्रिय आहेत. हा माणूस कारस्थानी नाही ही त्यांची ओळख बनली आहे. श्री. शरद पवार यांनी ठाकरे यांना काम करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे व सोनिया गांधी, राहुल गांधी यांचाही हस्तक्षेप नाही. कोरोनाच्या संकटकाळात उद्धव ठाकरे यांचा चेहरा हा राष्ट्रीय पातळीवरही सगळ्यांत आश्वासक चेहरा होता. हाच माणूस संकटातून रक्षण करेल हा विश्वास त्यांनी निर्माण केला. त्यांनी भव्य आरोग्य यंत्रणा उभी केली. लोकांना फॅमिली डॉक्टरप्रमाणे मार्गदर्शन केले. टीकेची पर्वा केली नाही. प्रसंगी कठोर वागले. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळे महाराष्ट्रावरील कोरोनाचे संकट थोडे मागे हटले. आजही महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत राज्य गणले जाते. याचे कारण इथे आजवर राजकीय स्थैर्य नांदत आले आहे. इथल्या कामगारांची उत्पादकता इतर राज्यांच्या तुलनेत वरच्या दर्जाची आहे. जनताही तुलनेत सुशिक्षित व आधुनिक विचारांचा स्वीकार करणारी आहे. इथली शासकीय यंत्रणा कार्यक्षम आहे आणि तिचा दृष्टिकोन आधुनिक व विकासोन्मुख आहे. ही सर्व व्यवस्था सरकारे आली व गेली तरी कायम असते. ती तशीच राहायला हवी. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने हे सर्व मोडून पडेल असे वागणे सोडायला हवे. फडणवीसांचे पहाटेचे राजकारण ७२ तासांत आटोपले. त्यास दोन वर्षे झाली. उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्या सोहळय़ाला दोन वर्षे होत आहेत.’
महत्वाच्या बातम्या:
- नव्या व्हेरिएंटचा धोका; एकनाथ शिंदेंनी दिल्या प्रशासनाला ‘या’ सूचना
- ‘मी अनकम्फर्टेबल होतो’ म्हणत सुनील शेट्टीच्या मुलाने सांगीतला ‘तो’ अनुभव !
- ‘किरीट सोमय्या यांना महत्व देण्याची गरज नाही’
- २४ महिन्यांतील मविआचे १०० घोटाळे, किरीट सोमय्यांनी केले उघड
- ‘या’ दोन सुपरस्टारसोबत रोहित शेट्टी करणार का काम?