पुण्यात मुळा कालव्याची भिंत फुटली, महापौरांना करावा लागला स्थानिक नागरिकांच्या रोषाचा सामना

पुणे : खडकवासला धरणातून पुणे शहराला आणि पुढे जिल्ह्याच्या पूर्व भागात जाणारा मुठा उजवा कालवा सिंहगड रस्त्यावर दांडेकर पुलाजवळ सकाळी सव्वा अकराच्या सुमारास फुटला. त्यामुळे दांडेकर पूल परिसरातील रस्त्यांना अक्षरश: नदीचे स्वरूप आले होते. कालवा फुटल्याने रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले असून झोपडपट्टी मध्ये पाण्याचा प्रवाह शिरला. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडाला. तसेच रस्त्यावरील वाहनधारकांचाही गोंधळ उडाला. अनेक वाहने पाण्याच्या प्रवाहात अडकली.

कालवा फुटल्याच्या घटनेनंतर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि स्थानिक नगरसेवक दांडेकर पुलाच्या परिसरात पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना स्थानिक नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला. निवडणुकीला मतं मागण्यासाठी आल्यानंतर आज तोंड दाखवत आहात. इतके दिवस आमच्या प्रश्नाकडे कानाडोळा केला, असा आरोप नागरिक करत आहेत.

जनता वसाहत येथील मुळा कालव्याची भिंत कोसळल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला. यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्यामुळे काही वेळासाठी वाहतूक कोंडीही झाली. मुठा नदीच्या उजव्या कालव्याला भगदाड पडलं. यामुळे दांडेकर पूल परिसरही जलमय झाला. या परिसरात एवढे पाणी झाले की काही गाड्या पाण्यात अडकल्या. तसेच कालव्याच्या शेजारी राहणाऱ्या लोकांचे संसार वाहून गेले.