‘हुकूमत अपना काम करे इस्लाम को ना बदनाम करे’ मुस्लिम महिला एकवटल्या

ट्रिपल तलाक बिला विरोधात शहरातील मुस्लिम महिलांचा मोर्चा

औरंगाबाद: मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या सूचनेनुसार ट्रिपल तलाक बिला विरोधात शहरातील मुस्लिम महिलांनी आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालयावर महामोर्चा काढला. मोर्चात हजारोंच्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता. शुक्रवारच्या विशेष नमाजनंतर दुपारी ३ वाजता आमखास मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली.

ट्रिपल तलाक विरोधात करण्यात आलेला हा कायदा शरियत मध्ये ढवळा ढवळ असून शरियतसाठी आम्ही जीवही देऊ व शरियतचा जो नियम आहे तो आम्हाला मान्य आहे. तसेच ‘शरियत मेरी जान है’ अशी उर्दू भाषेतील पट्टी कपाळावर बांधून ‘हुकूमत अपना काम करे इस्लाम को ना बदनाम करे, इस्लाम का जो दस्तुर है, वह हमको मंजूर है, तलाक बिल एक साजीश है. असे विविध फलक हातात घेऊन मुस्लिम महिलांनी या बिलाला विरोध दर्शवला. सरकारला जर समाजासाठी खरोखरच काही करायचं असेल तर त्यांनी शिक्षण, आरोग्य या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. असं मत यावेळी मोर्चात सहभागी महिलांनी व्यक्त केलं.