fbpx

शिवसेनेकडे मुस्लीमांचा ओढा, राष्ट्रवादीला कोकणात मोठा फटका

टीम महाराष्ट्र देशा : रायगड लोकसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.कारण हिंदुत्व या मुद्यावर एकत्र आलेले सेना – भाजप हे पक्ष मुस्लीम मताधिक्य आपल्या बाजूला वळवून घेण्यास यशस्वी ठरत आहेत. रायगडमधील शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्या ठिकठिकाणी होणाऱ्या प्रचार सभांमध्ये मुस्लिम तरूण मोठया संख्येने शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या मुस्लीम मतांमध्ये विभाजन होण्याची शक्यता आहे.

माजी मुख्यमंत्री ए. आर . अंतुले यांचे पुत्र नवीद अंतुले यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे अंतुले यांच्या जन्मगावी झालेल्या शिवसेनेच्या मुस्लिम समाज मेळाव्याला जवळपास हजारो मुस्लिमांनी हजेरी लावली असून महिलांची उपस्थिती देखील लक्षणीय ठरली.

शिवसेनेचे उमेदवार आनंत गीते यांनी जमलेल्या समुदायाला संबोधित केले. यावेळी आनंत गीते म्हणाले की, मुस्लिम समाजाकडे व्होट बँक म्हणून काही लोक पहात होते. परंतु त्यांची जहागिरी आता संपली आहे. तर आतापर्यंत मुस्लिम समाजाला शिवसेनेची भीती दाखवून मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले जात होते. परंतु या समाजाने आता या विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, असे नवीद अंतुले यावेळी म्हणाले.

दरम्यान रायगड मध्ये आनंत गीते आणि सुनील तटकरे यांची अटीतटीची लढत गेल्या लोकसभेला चांगलीच गाजली होती. गेल्या निवडणुकीत सुनील तटकरेंचा निसटता पराभव झाला होता. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे हे जोरदार प्रचार करून आपला विजय संपादन करू पाहत आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार आनंत गीते हे तटकरे यांची हक्काची व्होट बँक आपल्याकडे वळवून घेत आहेत.