मुस्लिम बांधवांनी सक्षम समाजासाठी इस्लामिक बँकिंग प्रणालीत सहभागी व्हावे : सहकार मंत्री सुभाष देशमुख

टीम महाराष्ट्र देशा : समाजातील गरीब व होतकरू बांधवांच्या उन्नतीसाठी जिल्हयातील सर्व मुस्लीम बांधवांनी इस्लामिक पतसंस्थेचे सभासद व्हावे असे आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.लोकमंगल इस्लामिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांची सर्वसाधारण सभा लोकमंगल बँक, प्रधान कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.

व्याज विरहित बँकिंग प्रणालीत सभासद होऊन सोलापूर शहर व सोलापूर जिल्हा ग्रामीणमधील मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदवण्यास सर्वांनी प्रयत्न करा, गरजूंना विनाव्याज कर्जवाटपातून व पारदर्शक कारभारातून इस्लामिक पतसंस्था नावारूपाला आणा असे मत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

लोकमंगल इस्लामिक नागरी सहकारी पतसंस्था हि पूर्णपणे व्याजविरहित इस्लामिक शरिया कायद्यातील नियमानुसार स्थापन करण्यात आलेली आहे. या संस्थेचा मुख्य उद्देश गरीब, गरजु नागरिकांना व्यवसाय, उद्योगधंदा व स्वयंरोजगार देण्यासाठी अर्थसहाय्य करणे हा आहे. या संस्थेची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली असून, त्यामध्ये संस्थेच्या सभासद नोंदणीस सुरुवात झाली आहे. लोकमंगल इस्लामिक नागरी सहकरी पतसंस्थेचे पहले सभासद होण्याचा मान माळकवठे ता. द. सोलापूर येथील साहेबलाल यांना मिळाला. सभासद होण्यासाठी कमीत कमी रु. २०००/- व प्रवेश फी रु .१००/- आकारण्यात आली आहे. तरी मुस्लीम व इतर समाज बांधवांनी सोलापुरातील या संस्थेचे सभासद होऊन एक आर्दश संस्थेची पायाभरणी करावी असे संचालक मंडळांनी सहमतीने अपेक्षा व्यक्त केली आहे.

यावेळी लोकमंगल इस्लामिक नागरिक सहकारी संस्था मर्यादित सोलापूरचे संचालक सुधाताई अळळीमोरे, इकबाल पटेल, इब्राहीम मौलाना, नझरुद्दिन मुजावर, आसिफ इकबाल, दिलीप कोरळे, सलीम काझी, जब्बार तांबोळी, सादिक तांबोळी, तय्यब जहागीरदार, शरीफ शेख, मुस्तफा बागवान, रीजवान पठाण, मनीष देशमुख, व पदाधिकारी उपस्थित होते.