मानवतेच्या संदेशासाठी मुस्लिमांचा मूक अमन मोर्चा !

muslim aman morcha

जालना: जमिअत उलमा-ए-हिंदतर्फे जालना शहरात शांततेसाठी मूक अमन मोर्चा काढण्यात आला. यामध्ये हजारो मुस्लीमांनी सहभाग घेतला. अमन मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी ग्रामीण भागातील मुस्लीम कार्यकर्ते सकाळपासून शहरात दाखल झाले होते. दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या अमन मार्चला सुरुवात करण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्वयंसेवकांनी मानवी साखळी केल्याचे दिसून आले.हातात राष्ट्रीय एकता व सामाजिक एकतेचा संदेश देणारे फलक घेतलेल्या युवकांचा मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. ठिकठिकाणी पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. कादराबाद, फूल बाजार, मामा चौक, गरीबशहा बाजार, मस्तगड, गांधीचमन मार्गे काढण्यात आलेल्या मार्चचे टॉऊन हॉल परिसरात सभेत रुपांतर झाले. या ठिकाणी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, सुधाकर निकाळजे, राजेंद्र राख, अब्दुल रशीद, जमाते इस्लामीचे अब्दूल मुजीब, अण्णा चितेकर यांनी मनोगत व्यक्त केले. जमिअत उलमाचे शहराध्यक्ष मुफ्ती रहेमान यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, की हा अमन मार्च सर्व जाती धर्मांचा आहे. अमन मार्चच्या माध्यमातून देशात शांती, राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा आमचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष हसन काशमी, एकबाल पाशा यांनी मार्गदर्शन केले. या वेळी पावसासाठी सामुहिक प्रार्थना करण्यात आली. राष्ट्रगीताने अमन मार्चची सांगता झाली. या अमन मार्चसाठी मुफ्ती फहीम, शाहआलम खान, शेख महेमूद, माजेद शेख, अ‍ॅड. सय्यद अमजद, मोहसीन शेख, अख्तर शेख, आमर पाशा आदींनी पुढाकार घेतला.

Comments
Loading...