‘मुश्रीफ हे भाजपला पुरून उरतील; आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे’

satej patil

कोल्हापूर : काल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसेच त्यांचा मुलगा नाविद हसन आणि पत्नीवर देखील आरोप केले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या व्यवहारातून मुश्रीफ यांनी तब्बल १०० कोटींहून अधिकच भ्रष्टाचार केल्याचा गंभीर सोमय्या यांनी आरोप केला होता.

दरम्यान यावर कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी मुश्रीफांची पाठराखण करत ते भाजपला पुरून उरतील असे सांगितले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले कि, ‘हसन मुश्रीफ यांच्यासारख्या सामान्य जनतेच्या हृदयात स्थान असणाऱ्या नेत्याला विनाकारण अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. पण आजपर्यंत अनेक संकटे ताकदीने परतवणारे मुश्रीफ हे या संकटावर तितक्याच ताकदीने मात करतील व भाजपला पुरून उरतील. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.’ असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केले आहे.

‘महाविकास आघाडीतील नेत्यांना विविध मार्गाने टार्गेट केले जात आहे. मुश्रीफ त्यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे त्यांचे मन निश्चितपणे व्यथित होऊ शकते. निवडणुकीमध्ये आरोप-प्रत्यारोप होतच राहतात, परंतु निवडणूक झाल्यानंतर एकदा जनतेने निर्णय दिल्यानंतर एखाद्या लोकप्रतिनिधीच्या व्यक्तिगत मागे लागणे, हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे. सर्वसामान्य जनतेचा नेता असलेल्या मंत्री मुश्रीफ यांच्या पाठीशी या काळामध्ये आम्ही कणखरपणे उभे राहणार आहोत.’ असे स्पष्ट मत यावेळी सतेज पाटील यांनी व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या