गुटखा पुडीच्या वादातुन धुळ्यात युवकाचा खुन

वाद अवघ्या दोन रुपयांचा

धुळे : शहरातील साक्री रोडवरील भीमनगरमध्ये गुटखा पुडीच्या वादातून एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे भीमनगरमध्ये तणाव निर्माण झाला होता. घटनेनंतर या भागात तोडफोडीची घटना झाली. त्यानंतर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

साक्री रोडवरील भीमनगरात राहणारा संदीप विजय ठाकूर (वय २२) हा युवक परिसरात असलेल्या एका किराणा दुकानात रात्री दहा वाजेच्या सुमारास गुटखा पुडी घेण्यासाठी गेला. त्या वेळी दुकानदाराने त्याला पुडी महाग झाल्याने आता ती १२ रुपयांना मिळेल असे सांगितले. या वेळी संदीपने नेहमीच १० रुपयांना पुडी घेतो असे सांगत दुकानदाराच्या हातात १० रुपये दिले. उर्वरित दोन रुपयांवरून दुकानदार चंद्रकांत चव्हाण आणि संदीप ठाकूर यांच्यात वाद झाला. या वेळी इतरही एक-दोन जण दुकानदाराच्या बाजूने धावून आले . त्यांनी संदीपला धक्का दिला. त्यामुळे तो जमिनीवर पडला. त्याच्या डोक्याला इजा झाली. त्याला नागरिकांनी नातेवाइकांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

या घटनेनंतर भीमनगरमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला . याप्रकरणाचा तपास सुरु आहे. याघटनेनंतर काही जणांनी त्या दुकानदाराचं घर देखील जाळुन टाकले. यामुळे वातावरण अधिक तापल आहे.