fbpx

‘गली बॉय’मधील मुराद-सफ़ीनाचं नातं सर्वोत्तम केमिस्ट्री पैकी एक

गली बॉय मध्ये दाखवलेलं मुराद आणि सफ़ीनाचं नातं हे मी आजवर बॉलीवूडमध्ये बघितलेल्या सर्वोत्तम केमिस्ट्री पैकी एक आहे.

एकमेकांशी अजिबात ओळख नसलेल्या स्वतंत्र एंटिटी सारखा बसमध्ये असलेला वावर आणि पुढच्याच क्षणाला सीट, इअरफोन शेअर करत एकमेकांच्या हातात हात घेऊन सहजतेने एकमेकांना अधिकाराने शेअर करणे हा सिन निव्वळ अफलातून आहे. ज्या कम्फर्ट लेव्हल ला पोचायला कुठल्याही कपल ला वर्षानुवर्षे लागू शकतात, तिथे हे कुठले दिव्य करून पोचले असतील याची कल्पना फक्त त्या 90 सेकंदाच्या सिन मध्ये येते.

घरात बापाचं दुसरं लग्न अन पुढचा तमाशा हतबल होऊन बघिल्यावर मुराद रात्री गच्चीवर येतो आणि वही घेऊन भावना उतरवत बसतो. –

इस बस्ती में सारी पलके गीली क्यों है,
दिन पथरीले रातें ज़हरीली क्यों है
क्यों बेबस है, झुंझुलाया है जो भी यहाँ है
क्यों लगता है ये बस्ती एक अंधा कुंवा है

– सकाळी उठतो तेव्हा आपल्यासोबत, घरात जे काही झालं असेल ते शेअर करावं म्हणून सफ़ीना ला ‘ब्रिज वर ये’ असा मेसेज टाकतो. तिथे पोचल्यावर सफ़ीना ‘क्या हुआ?’ विचारते आणि हा काहीच नाही असं म्हणत मान टाकतो. अर्ध्या मिनिटाच्या त्या मूक संवादात ती त्याच्या ओठावर हलकेच ओठ ठेवून निघून जाते. मुराद रात्री कुठल्या परिस्थितीतुन गेला असेल हे सगळं कळलंय आणि तरीही आपण ठामपणे सोबत आहोत हे दाखवण्याचा याहून गोड मार्ग कुठला असेल.

बरं सफ़ीना ला कुठे बोलावं आणि कुठे नाही हे, कुठे मुराद ला बोलतं करावं आणि कुठे गप्प हे देखील नेमकं कळतं. – टॉयलेट च्या खिडकीतून ‘ती’ आणि खाली पायरीवर बसलेला ‘तो’. दिवसभरात माझ्यासोबत काय विशेष घडलं असेल हे कौतुकाने सांगण्यासाठी मुराद येऊन बसतो. त्याला एवढं खुश बघून ती उत्सुकतेने म्हणते, ‘सब शुरू से बता।’ त्याला विश्वास देते की तू जे स्वप्न बघतोय ते बिनधास्त कर, मी आहे सोबत. तिला स्वतःच्या प्रायोरिटीज अन स्वाभिमान सांभाळून सुद्धा मुराद ला कुठेही कमीपणा जाणवू द्यायचा नाहीये. ‘क्या चाहिए तेरे को लाईफ में?’ ह्या मुराद च्या प्रश्नावर ती उत्तर देते –

– ‘मेरा खुद का प्रैक्टिस, तेरे से शादी’
– ‘अच्छा? मैं सेकंड हूं क्या?’ – मुराद
– ‘ज़िंदगी में कुछ अच्छा मिले ना, तो चुपचाप ले लेने का.’

कितीही मधुर असले तरी गरम मऊ गुलाबजाम वर चमचा ठेवावा अन त्या चमच्याच्या वजनाने त्याचे दोन तुकडे व्हावे, असं प्रमाण फार क्वचित वेळा जुळून येतं. ते तयार करणारे हात नेहमीचे असले तरीही. नायक नायिकेचा एकमेकांबद्दल डोळ्यातून झिरपणारा विश्वास-कौतुक-प्रेम-अभिमान आणि जोडीला असे संवाद हे सगळं दिवास्वप्न वाटावं इतकं परफेक्ट जुळून आलय. विजय मौर्य चे संवाद इथे जान आणतात. ड्रायव्हर मुराद रात्रभर गाडीत थांबणार ह्या बद्दल हळहळ न करता त्याला तिथे मुव्ही बघायला मिळावा म्हणून स्वतःकडचा ipad अजिबात विचार न करता सफ़ीना कायमसाठी हातात देते. ओशाळून मुराद म्हणतो, ‘मैं तेरे को ऐसा कुछ नहीं दे सकता है.’

मुराद चा स्वाभिमान सांभाळत त्याला गप्प करण्यासाठी ती त्याच्या ओठांवर ओठ नेत बोलते,

– ‘मैं जैसी हूं वैसे रहने देता है तू, तेरे से महँगा और कुछ नहीं है मेरे लाईफ में!’

असं असलं तरी मुराद ला तिने कधीच गृहीत धरलेलं नाहीये. आणि हे नातं टिकवण्यासाठी ती वेळप्रसंगी काहीही करायला तयार आहे. मुराद च्या मागे असलेल्या एका मुलीसोबत मारामारी करायला, कुणाचं डोकं फोडायला ती अजिबात कचरत नाही. उलट कुठलाही गंड न बाळगता सांगते की, ‘तू शुकर कर उसकी गर्दन नहीं तोड़ी मैं. अभी एक ही लाईफ है, एक ही तू है, ऊपर से वो घुस रही है बीच में… गुस्सा नहीं आएगा क्या?’ मुराद ला दुसऱ्या मुलीसोबत काम करताना बघून सुद्धा तिचा जीव खाली वर होतो. मुराद कल्की सोबत म्युजिक ची तयारी करतोय हे समजल्यावर ती, ‘अब तू इससे कनेक्ट हो गया है, म्यूजिशियन हो गया है? और तेरा एग्झाम?’ असे विचारत जो चेहरा करते तो केवळ अवर्णनीय. 5-6 वर्षाच्या लहान मुलाला आपल्या घरात भाऊ येणार आणि आपल्यावरचं प्रेम कमी होणार असं जेव्हा समजणार असतं तेव्हा ते लहान मूल सुद्धा बिथरणार नाही इतकी सफ़ीना प्युअर मनाने तळमळते. मुराद सोबत थोडे खटके उडाल्यानंतर सुद्धा पुन्हा जवळ येण्यासाठी शक्य तेवढे सगळे प्रयत्न तिला करायचे आहे.मानपमान बाजूला ठेवून. ‘रॅप बॅटल’ मध्ये 2 राऊंड क्लियर झाल्यावर मुराद ला पुढे काय वाढून ठेवलय हे माहीत नाहीये. त्याला जवळ घेऊन सफ़ीना विश्वास देते,‘तेरे को जो करनेका है कर, मैं सर्जन बनने जा रही हूं. अपन मस्त जियेंगे.’

‘मुराद’ नावाचा अर्थ होतो – अभिलाषा. इच्छा. ‘सफ़ीना’ म्हणजे जहाज. बोट.

रणबीरला म्युजिक व्हिडिओ साठी मदत करणाऱ्या कल्की चं सिनेमातील नाव आहे ‘स्काय’. धारावी च्या वस्तीत अन मुराद ज्या बॅकग्राऊंड मधून आलाय ते माहीत असून त्याच्यातला हट्टीपणा, निरागसपणा सफ़ीना ने शाबूत ठेवलाय. आकाश सोडताना तिला सफ़ीना चं महत्त्व सांगताना मुराद म्हणतो, – ‘सफ़ीना के बिना मेरा ज़िंदगी ऐसे होएगा, जैसे बिना बचपन के बड़ा हो गया.’ असा जोडीदार ज्यांना मिळतो ते नशीबवान. त्याला/तिला सोबत घेऊन ‘गली बॉय’ बघून या. ‘एका अंडरडॉग ने परिस्थितीशी झगडून मिळवलेलं यश’ हा ह्या महाकाव्याचा फक्त एक पापुद्रा आहे. आत जाणार तसं बरच काही मिळेल. मला अजून काय हातात लागलं.

– जितेंद्र घाटगे