माझ्या कारकिर्दीत मनपाच्या शाळा सर्वोत्तम करणार; नागपूरच्या महापौरांचा निर्धार 

dayashankar tiwari

नागपूर : शिक्षण हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. विश्वास ठेवा. माझ्या कारकिर्दीत नागपूर महानगरपालिकेच्या शाळा सर्वोत्तम करण्यात येईल. त्यासाठी टप्प्याटप्प्याने काम करण्यात येईल, असे आश्वासन महापौर दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी दिले.

सरकारी शाळा वाचवा संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज महापौरांनी सविस्तर चर्चा केली. या समितीच्या वतीने सरकारी शाळा वाचवा अभियान सुरू करण्यात आले आहे. बंद पडलेल्या शाळांचा अहवालही तयार केला आहे. अभियानाचे संयोजक सामाजिक कार्यकर्ते दीपक साने यांनी प्रारंभी महापौरांकडे भूमिका मांडली.

आगामी काळात शहरातील सहा विधानसभा मतदारसंघातील एकूण सहा शाळा अजेंड्यावर घेतल्या असून त्या शाळांत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळेल. अशी माहिती यावेळी महापौरांनी दिली. अमिताभ पावडे, अॅड. रेखा बारहाते, प्रमोद काळबांडे, प्रसेनजित गायकवाड, खुशाल ढाक, संजय भिलकर, कृष्णा गावंडे, राम कोरके आदींनीही मनपा शाळांच्या स्थितीविषयी महापौरांना माहिती दिली.

शिक्षकांच्या प्रशिक्षणाबाबतही चर्चा झाली. तसेच शाळाबाह्य बालकांना शोधून त्यांना शाळेत दाखल करण्याची बालरक्षकांची यंत्रणा राज्य सरकारने निर्माण केली आहे. या बालरक्षकांची कार्यशाळाही आयोजित करण्याबाबत चर्चा झाली. शाळा का बंद पडत आहेत, यावर चर्चा करण्यात आली असून त्याची कारणमिमांसा करण्याचे आदेशही महापौरांनी दिले. शिक्षणासाठी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात तरदूत वाढविण्यासोबतच आणखी नवीन काही पर्याय शोधता येईल काय याविषयावरही महापौरांनी चर्चा केली.

मनपाच्या नागपूर शहरातील सर्व शाळा उत्तम करण्यासाठी व्यापक कृती कार्यक्रम तयार करण्यात येईल, असे आश्वासनही महापौर दयाशंकर तिवारी यांनी सरकारी शाळा वाचवा संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. पुढील महिन्यात पदाधिकाऱ्यांसोबत महापौरांची बैठक होणार आहे. या बैठकीत मनपा शाळांबाबत एक समन्वय समितीही गठित करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या