गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विहिरींमधील गाळ काढण्यासाठी मनपा करणार लाखो रुपयांचा खर्च!

औरंगाबाद : यंदाच्या गणेशोत्सवासाठी महापालिकेने आवश्यक तयारी सुरू केली आहे. दहा पैकी चार विसर्जन विहिरींमधील गाळ काढण्याच्या कामासाठी साडे सोळा लाखांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. उर्वरित सहा विहिरींमधील गाळ काढण्याच्या कामाची निविदाही लवकरच प्रसिद्ध होणार आहे. सर्व दहा विहिरींमधील गाळ काढण्याच्या कामावर एकूण ४२ लाख रुपयांचा खर्च केला जात आहे. याशिवाय दोन ठिकाणी कृत्रिम तलाव तयार केले जाणार असून त्यावर देखील प्रत्येकी साडेचार लाख रुपये खर्च होणार आहे.

गणेशोत्सवापूर्वी महापालिकेकडून शहराच्या विविध भागांमध्ये गणेशमूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. गतवर्षी शहरात दहा विहिरींमध्ये गणेशमूर्ती विसर्जनाची सुविधा मनपाद्वारे उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याशिवाय दोन ठिकाणी कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्यात आले होते. दर वर्षी गणेशोत्सवापूर्वी विहिरींमधील गाळ काढून त्याची स्वच्छता केली जाते मात्र मागील काही वर्षांपासून या विहिरींमधील गाळ काढण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च होत आहे. नवीन विहीर खोदण्यासाठी सरासरी तीन ते चार लाख रुपये लागतात.

मात्र महापालिकेकडून एका विहिरीतील गाळ काढण्यासाठी त्याहीपेक्षा अधिक खर्च केला जात असल्याचे चित्र आहे. महापालिकेने विसर्जन विहिरींची ठेकेदारांकडून स्वच्छता करून घेण्याचे ठरवले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात संघर्ष नगर, मुकुंदवाडी, संतोषीमातानगर, सिडको एन-२ मधील गाळ काढण्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध केली आहे. या निविदांची अंदाजपत्रकीय रक्कम तब्बल १६ लाख ६० हजार रुपये इतकी आहे. उर्वरित ६ विसर्जन विहिरींचा गाळ काढण्याच्या कामाची निविदाही प्रसिद्ध होणार आहे. सर्व १० विहिरींवर एकूण ४२ लाख रुपये इतका खर्च होणार असल्याचे समजते.

महत्त्वाच्या बातम्या

IMP