बेकायदा मांडव उभारलेल्या १४० मंडळांना महापालिकेची नोटीस

पुणे : गणेशोत्सवासाठी शहरात जोरदार तयारी सुरू असून अनेक गणेश मंडळांकडून मांडव टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, परवाने न घेता बेकायदेशीरपणे रस्त्यावर खड्डे खोदून मांडव, कमानी टाकणा-या मंडळांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. विनापरवाना मांडव, कमानींसाठी रस्त्यावर खड्डे खोदणा-या मंडळांची पाहणी करण्याचा आदेश महापालिका प्रशासनाने दिला असून आतापर्यंत बेकायदा मांडव उभारलेल्या १४० मंडळांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.आगामी गणेशोत्सवाच्या निमित्ताने महापालिका आणि पोलीस प्रशासनातर्फे अवघ्या एका क्लिकवर गणेशोत्सव मांडव आणि कमानींचे परवाने ऑनलाईन घेण्याची सुविधा सार्वजनिक गणेश मंडळांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे एक हजार ७५० मंडळांनी पोलिसांकडे ऑनलाईन अर्ज केले असून त्यापैकी सुमारे ६५० मंडळांना परवानगी देण्यात आली आहे.महापालिकेने ३५० मंडळांना परवानगी दिली असून त्यानुसार मंडळांनी मांडव आणि कमानी उभारण्यास प्रारंभ केला आहे. मात्र, काही मंडळांनी बेकायदेशीरपणे मांडव आणि कमानी उभारल्या असून त्यासाठी खड्डे घेतल्याचे दिसून आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शहरात पाहणी करून बेकायदेशीरपणे मांडव, कमानी उभारणारे व त्यासाठी रस्त्यावर खड्डे खोदणा-या गणेश मंडळांना नोटीसा बजावण्याची सूचना महापालिकेचे अतिक्रमण विभागप्रमुख माधव जगताप यांनी प्रशासनास केली आहे. या पाहणीचा अहवाल राज्यशासनाकडे पाठविण्यात येणार आहे. याशिवाय उत्सवादरम्यान रस्त्यांवरील बेकायदा ठेले, हातगाड्या आणि पथारी व्यावसायिकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

You might also like
Comments
Loading...