महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केली जलकुंभ पाहणी

औरंगाबाद : नवीन जलयोजनेच्या कामास कंत्राटदाराने नुकतीच सुरूवात केली आहे. दुसरीकडे जलयोजनेच्या कामासाठी सर्वेक्षणही केले जात आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत प्रस्तावित जलकुंभ आणि जलशुध्दीकरण केंद्रासाठीच्या जागांची पाहणी महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) अधिकार्‍यांनी संयुक्तपणे केली.

यावेळी कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी देखील होते. सर्वेक्षणादरम्यान आता जलशुध्दीकरण केंद्रासाठीच्या जागेची मोजणी देखील सुरु केली असल्याचे समजते. राज्य सरकारने औरंगाबाद शहराच्या जलयोजनेसाठी १६८० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. निधी मंजुरीनंतर या योजनेच्या कामासाठी एमजेपीने जीव्हीपीआर या कंपनीला वर्कऑर्डर दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५ फेब्रुवारी रोजी औरंगाबादचा दौरा केला, यावेळी त्यांनी जलयोजनेचे काम गतीने करा, या कामात दिरंगाई सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे. त्यामुळे पालिका आणि एमजेपीकडून या योजनेच्या दृष्टीने संयुक्त काम सुरु करण्यात आले आहे.

दरम्यान, शनिवारी पालिका आणि एमजेपीच्या अधिकार्‍यांनी शहर व परिसरात संयुक्त पाहणी केली. दरम्यान, या योजनेतून सातारा आणि सातारा तांडा परिसरात नवीन जलकुंभ बांधले जाणार आहेत. त्यासाठी तीन ठिकाणच्या जागांची पाहणी केली. किटली गार्डनच्या परिसराची पाहणी देखील जलकुंभ उभारणीच्या दृष्टीने केल्याचे सूत्रांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या