मनपा प्रशासकांचा सायकलवर फेरफटका; शहरासह खाम नदीची पाहणी

औरंगाबाद : ऐतिहासिक खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्प विकासाचा ध्यास घेतलेले मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शनिवारी अचानक सायकलवर स्वार होऊन शहरात एकटे फिरून नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी खाम नदीकडे जात कामांची पाहणी केली. त्यानंतर उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.

खामनदी पुनरुज्जीवन विकास प्रकल्पाचे काम माझी वसुंधरा अभियानांतर्गत गेल्या २५ जानेवारी २०२१ पासून प्रत्येक शनिवारी महानगरपालिका, स्मार्ट सिटी, ईको सत्व, छावणी परिषद, व्हेरॉक, विविध स्वयंसेवी संस्थां व लोकसहभागातून सुरु आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय हे निवासस्थानापासून सायकलवर स्वार होऊन शहरात फिरून नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांची पाहणी करून खाम नदीवर आले.

यावेळी त्यांनी सायकलवर फिरून विकास कामाची पाहणी करून खाम नदी लोखंडे पुलाजवळ भर पावसात कर्मचारी व कामगारांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या . पाण्या पावसात आणि चिखलात काम करत असल्याचे बघून प्रशासकांनी त्यांचे कौतुक केले. यानंतर मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय हे सायकल वर स्वार होऊन निवासस्थानाकडे रवाना झाले. नुकताच औरंगाबाद शहराला केंद्र सरकारचा सायकल फॉर चेंज पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकांनी सायकलवर बसून नागरिकांना पूर्ण देणाऱ्या मूलभूत सुविधांची पाहणी करून खाम नदीला भेट दिली.

महत्त्वाच्या बातम्या