सायकलवर मनपा प्रशासकांची ‘स्टंटबाजी’, एकाच फेरीत पाहिल्या शहरातील मुलभूत सुविधा

औरंगाबाद : शहरातील मुलभूत समस्यांनी नागरिक हैराण असतांना, मनपा प्रशासक तथा आयुक्त यांनी चमत्कार करत चक्क सायकलवर रपेट मारून शहरातील समस्या जाणून घेतल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे सायकल वर फेरफटका मारत प्रशासकांनी नुसती ‘स्टंटबाजी’ केल्याचीही चर्चा शहरात सुरू झाली. कचरा, पाणी यासारख्या विषयावर लोकप्रतिनिधी आंदोलन करीत असताना. मनपा प्रशासकांनी नेमकी कोणती पाहणी केली, हे हि सध्या गुलदस्त्यात आहे.

शहरवासी सध्या अनेक समस्यांना तोंड देत आहेत. त्यात मुख्यत्त्वे पाण्याची समस्या तर मागील काही वर्षांपासून जटील होत आहे. शनिवारी मुलभूत समस्यांची पाहणी करत असताना, प्रशासक नेमके कोणत्या पाण्याच्या टाकीला भेटीला गेले, हा सवाल अनुत्तरीत आहे. कचरा प्रश्न मार्गी लावण्याचा दावा करीत असलेल्या मनपात नुकतेच एमआयएमच्या माजी नगरसेवकाने आंदोलन करीत कार्यालयाच्या गेटलाच टाळे ठोकले होते. त्या भागाचीही पाहणी करण्याची तसदी मनपा आयुक्तांनी घेतली नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

केंद्र सरकारने सायकल ट्रॅकचे कौतुक केल्यामुळे प्रशासकांना सायकलवर फिरण्याची उपरती झाली असल्याचीही चर्चा मनपा वर्तुळात दबक्या आवाजात सकाळपासूनच सुरु होती. आज घडीला सायकल ट्रॅक समोर हातगाडी, फेरीवाले, कार तसेच दुचाकी लावून क्रांती चौक ते स्टेशन रस्त्याला उभे असतात. पाहणीत या सर्वांकडे प्रशासकांनी डोळेझाक केली का? असा सवाल त्या रस्त्यावरून जाणारे वाहनधारक करीत आहे. मात्र, आज पाहणीत प्रशासकांनी नेमके काय पहिले? हा सवाल जरी गुलदस्त्यात असला तरी एकाच सायकल स्वारीच्या फेरीत पाहणी होत असल्याचा चमत्कार त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या